मराठा मंडळातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:30 AM2021-03-21T04:30:15+5:302021-03-21T04:30:15+5:30
रत्नागिरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘माझा परिवार, माझी जबाबदारी’ या विषयाच्या अनुषंगाने मराठा मंडळातर्फे दोन गटांत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...
रत्नागिरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘माझा परिवार, माझी जबाबदारी’ या विषयाच्या अनुषंगाने मराठा मंडळातर्फे दोन गटांत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटांसाठी स्पर्धेकरिता एकच विषय निश्चित केला आहे. कोरोना काळातील कुटुंब, वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, मोबाइलशी मित्रत्व की शत्रुत्व, पाणी वाचवाल, तर वाचाल, पर्यावरण संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत कोणालाही सहभागी होता येणार असून, स्पर्धा दोन गटांत विभागण्यात आली आहे. आठवी ते अकरावी व दुसरा खुला गट अशा दोन गटांत स्पर्धा होणार आहे. तरी जास्तीतजास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन्ही गटातील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत, शिवाय दोन उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर करून त्यांनाही पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी स्मिता कदम (फणसोप), नेत्रा राजेशिर्के (फणसोप), शंकर जाधव (पाली), चंद्रमोहन देसाई (हातखंबा), चेतन साळवी (मालगुंड), प्रा. प्रताप सावंतदेसाई (खेडशी) केंद्रप्रमुख निश्चित करण्यात आले आहेत. स्पर्धकांनी केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धा रविवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कोरोनासंबंधी शासकीय नियमावलीचे पालन करूनच स्पर्धा घेण्यात येणार आहे.