Maratha Reservation : मराठा समाजाचे शुक्रवारी रत्नागिरीत आंदोलन, अत्यावश्यक सेवा वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 05:29 PM2018-08-01T17:29:09+5:302018-08-01T17:32:18+5:30
मराठा समाज गेली दोन वर्षे आरक्षणासाठी आंदोलने करीत असून, शासनाकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता येत्या शुक्रवारी, ३ रोजी आरक्षणासाठी तीव्र आंदोलन उभारून या दिवशी संपूर्ण जिल्हा बंद करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.
रत्नागिरी : मराठा समाज गेली दोन वर्षे आरक्षणासाठी आंदोलने करीत असून, शासनाकडून केवळ दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता येत्या शुक्रवारी, ३ रोजी आरक्षणासाठी तीव्र आंदोलन उभारून या दिवशी संपूर्ण जिल्हा बंद करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला.
रत्नागिरीतील मराठा समाजानेही तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी केली आहे. त्यादृष्टीने या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तसेच नियोजन करण्यासाठी येथील विवेक हॉटेलच्या मैदानावर मराठा समाजाची बैठक माजी खासदार नीलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी व्यासपीठावर मराठा सकल समाजाच्या मंगला नलावडे, माजी उपनगराध्यक्ष संजू साळवी, सुधाकर सावंत, नित्यानंद दळवी, भाऊ देसाई, केशव इंदुलकर, संतोष तावडे, प्रताप सावंत-देसाई उपस्थित होते.
या सभेत सुधाकर सावंत, प्रताप सावंत - देसाई यांनी मुख्यमंत्री आरक्षणाबाबत केवळ आश्वासनेच देत आले आहेत, त्यामुळे आता तीव्र आंदोलनाला पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. यासाठी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन केले. मंगला नलावडे यांनी आंदोलन करणे काळाची गरज आहे. मात्र, जाळपोळ करून आंदोलनाला अर्र्थ येतो का, असा सवाल केला. आंदोलन करताना कोकणाला कोणताही डाग लागता कामा नये, याची काळजी घेऊया, असे मत व्यक्त केले.
माजी खासदार नीलेश राणे यांनी समाज म्हणून सर्वांनी एकत्र येऊया, असे आवाहन केले. तसेच उत्स्फूर्त सहभाग असला की, आंदोलने आपोआप यशस्वी होतात, असे मत प्रदर्शित केले. या दिवशी जिल्हा बंद होणारच, त्यासाठी सर्व बाहेर पडणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच यादिवशी इतर सर्र्व व्यावसायिकांनीही बंद पाळून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मात्र, यात अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले गेले.
तेव्हा कुठे होते लोकप्रतिनिधी ?
काही दिवसांपुर्वी पाली येथील मराठा बांधवांनी आंदोलन केले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र, त्यावेळी मराठा समाजाचे जिल्ह्यात चार आमदार असूनही तसेच लोकप्रतिनिधींपैकी कुणीही एकही केस होऊ देणार नाही, असे म्हटले नाही, अशी खंत पालीचे तात्या सावंतदेसाई यांनी व्यक्त केली. यावेळी निलेश राणे यांनी या आंदोलनात एकही गुन्हा दाखल होणार नाही, याची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन निलेश राणे यांनी दिले.