अनुदानित सिलिंडरच्या लाभासाठी आता मार्चची डेडलाईन
By admin | Published: December 23, 2014 12:45 AM2014-12-23T00:45:41+5:302014-12-23T00:54:35+5:30
राधाकृष्णन बी. : आधारकार्ड आता पुन्हा सक्तीचे होणार
रत्नागिरी : गॅसधारकांना बारा गॅस सिलिंडर अनुदानित किमतीने मिळण्यासाठी सुधारित थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेची अंमलबजावणी १ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. अजूनही ज्यांनी आधारकार्ड वा बँक खात्याचा खात्याचा क्रमांक गॅस एजन्सीला संलग्न केल्या नसल्यास तो त्वरित करून घ्यावा. सद्यस्थितीत त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असले तरी अशा ग्राहकांसाठी ३१ मार्च २०१५ ही ‘डेडलाईन’ ठरवून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अनुदानित गॅस सिलिंडरचे अनुदान बँकेत जमा होण्यासाठी गॅसधारकांना गतवर्षी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले होते. मात्र, आधारकार्डच्या नोंदणीत अडचणी आल्याने ही थेट लाभ हस्तांतरण योजना राबविताना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने आता या योजनेत सुधारणा केली आहे. आता ग्राहकांना १२ही सिलिंडर सवलतीच्या दराने मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी ज्यांची आधारकार्ड नोंदणी अद्याप झालेली नाही वा ज्यांचे बँक खाते अद्याप गॅस एजन्सीशी संलग्न नाहीत, त्यांनी ती मार्चअखेरपर्यंत यापैकी एकतरी पुरावा संलग्न करावा लागणार आहे. त्यांना अनुदानित सिलिंडरचा लाभ मिळेल. मात्र, ३१ मार्चनंतर आधारक्रमांक वा बँक खाते क्रमांक एजन्सीशी संलग्न न झाल्यास त्यांना एप्रिल ते जूनपर्यंत बाजारभावाने सिलिंडर घ्यावा लागेल. जूनमध्ये त्यांनी आधारक्रमांक संलग्न केल्यास एप्रिल ते जूनपर्यंतचे अधिक भरलेले पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतील. जूननंतरही आधारक्रमांक व बँक खाते संलग्न केल्याशिवाय त्या ग्राहकांना ‘डीबीटी’ योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती यावेळी पुरवठा अधिकारी नीता शिंदे यांनी दिली. गॅसधारकांनी आपले खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडून तो क्रमांक आपल्या गॅसएजन्सीकडे द्यावा, तसेच आधारकार्ड नोंदणीसाठी जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्रांत सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील एकूण २ लाख २३ हजार ७२७ ग्राहकांपैकी आधारनोंदणी १ लाख ४६ हजार २७० (६५.४० टक्के) ग्राहकांनी केली असून बँकेचे खाते तसेच आधारक्रमांक संलग्न असलेल्या ग्राहकांची संख्या ५१.५३ टक्के इतकी असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)