शासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 03:09 PM2021-03-20T15:09:45+5:302021-03-20T15:12:47+5:30
Government Ratnagiri-मार्चअखेर जवळ आल्याने शासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. बिले खर्ची टाकण्यासाठी तसेच पगार मिळावेत, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात सध्या गर्दी होऊ लागली असून या कार्यालयात बिलांची संख्या वाढू लागली आहे.
रत्नागिरी : मार्चअखेर जवळ आल्याने शासकीय सर्व कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. बिले खर्ची टाकण्यासाठी तसेच पगार मिळावेत, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात सध्या गर्दी होऊ लागली असून या कार्यालयात बिलांची संख्या वाढू लागली आहे.
सध्या सर्वच कार्यालयांमध्ये मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. त्यामुळे कामांचा निपटारा होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सायंकाळी कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ थांबावे लागत आहे. सर्व कामांची बिले तयार करून ती कोषागार कार्यालयाकडे पाठविण्याकामी सर्वच कर्मचारी यात अडकले आहेत. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालये सध्या गजबजलेली आहेत.
जिल्हा कोषागार कार्यालयातही सध्या मार्च एंडिंगची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे २३५ कार्यालयांतील विविध बिले, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक देयके, कार्यालयीन खर्च, वीज बिले, फोन बिल, सेवानिवृत्तांचे पगार आदी कामे या कार्यालयाकडून केली जातात. त्यामुळे या सर्व देयकांचा निपटारा करण्यात जिल्हा कोषागार कार्यालय गुंतले आहे.
मार्च महिना सुरू होताच सर्वच कार्यालयांची वर्षाचा निधी खर्ची पडावा आणि त्याची बिले मिळावीत, यासाठी तारांबळ सुरू होते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले, प्रवास भत्ते, स्टेशनरी बिले, पुढील वर्षासाठी खरेदी, शासकीय वाहनांवरील दुरुस्तीचा खर्च आदींची बिले कोषागार कार्यालयाकडे ३१ मार्चपूर्वी सादर करण्यासाठी ही सर्व कार्यालये धावपळ करत आहेत.
नुकसान भरपाई वाटपाची धांदल
जिल्ह्यात जून महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ तसेच पावसाळ्याच्या कालावधित निर्माण झालेली पूरपरिस्थिती यामुळे जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले आहे. भरपाईचा निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे आला आहे.
निवडणुकीच्या बिलांची धांदल
जानेवारी महिन्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्याने आता मार्चअखेर निवडणुकीसाठी झालेल्या खर्चांची बिले करताना सर्व तहसील कार्यालयांच्या निवडणूक शाखेची दमछाक झाली आहे. निवडणूक कार्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या मानधनाची बिले करतानाच दमछाक होऊ लागली असून इतर निधी खर्चाचीही बिले सादर करावी लागत असल्याने आता शेवटच्या टप्प्यात धांदल उडाली आहे.