सागरी मासेमारी ठप्प; पर्ससीनला उद्याचा मुहूर्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:25 AM2017-09-02T00:25:28+5:302017-09-02T00:26:49+5:30
रत्नागिरी : पारंपरिक सागरी मासेमारीला १ आॅगस्टपासून कायदेशीररीत्या सुरुवात झाली असली तरी पावसाळी वातावरणामुळे गेल्या महिनाभरात जेमतेम १५ दिवसच मासेमारी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पारंपरिक सागरी मासेमारीला १ आॅगस्टपासून कायदेशीररीत्या सुरुवात झाली असली तरी पावसाळी वातावरणामुळे गेल्या महिनाभरात जेमतेम १५ दिवसच मासेमारी झाली आहे. चार दिवसांपूर्वी समुद्रात वादळ आल्याने अद्यापही पारंपरिक मासेमारी ठप्प आहे. आता पर्ससीन मासेमारीची मुदतही सुरू झाली आहे, पण आता पारंपरिक व पर्ससीन मासेमारी ईदनंतर ३ सप्टेंबरपासूनच सुरू होणार असल्याची माहिती मच्छिमारांकडून देण्यात आली.
२०१६ फेब्रुवारीपासून सागरी पर्ससीन मासेमारीला बंधने घालण्यात आली. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांतच साडेबारा वाव सागरी क्षेत्राबाहेर पर्ससीन मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी मासेमारीचे व्यवहार ठप्प असतात. सध्या सागरी हवामानही खराब असल्याने पारंपरिक मासेमारांनी समुद्रात न जाता नौका बंदरात नांगरून ठेवल्या आहेत. २ सप्टेंबरला ईद असल्याने १ सप्टेंबरपासून नियमानुसार सुरू होणारी पर्ससीन मासेमारीही सुरू झालेली नाही. आता हवामान चांगले राहिल्यास येत्या ३ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती कर्ला मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नदीम सोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
२१० नौकांना व्ही. टी. एस. परवाने
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन मासेमारी करणाºया २१० नौकांना व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम अर्थात व्ही.टी.एस. यंत्रणा वापरण्याचे परवाने मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आले आहेत. पर्ससीन नौकांनी कोणत्याही स्थितीत साडेबारा वाव सागरी क्षेत्राबाहेरच मासेमारी करावी, त्यांच्या नौका नेमक्या या क्षेत्राबाहेरच आहेत की नाहीत, याची माहितीही मत्स्य विभागाला मिळणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
पारंपरिक-पर्ससीन संघर्षाची धार
१ आॅगस्टपासून पर्ससीन वगळता सर्व पारंपरिक प्रकारातील सागरी मासेमारी सुरू झाली. खराब हवामान आणि ईद यामुळे १ सप्टेंबरऐवजी ३ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू होणार आहे. या दोन्ही मच्छिमारांमध्ये सागरी हद्दीवरून गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. ३ सप्टेंबरपासून सुरू होणाºया पर्ससीन मासेमारीवर पारंपरिक मासेमारांचीही नजर राहणार आहे. व्ही. टी. एस. यंत्रणेचा योग्य वापर होईल व या दोन्ही मच्छिमारांमध्ये संघर्ष होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.