सागरी सुरक्षक समस्याग्रस्त
By admin | Published: September 5, 2014 10:09 PM2014-09-05T22:09:47+5:302014-09-05T23:21:35+5:30
अजून बोध नाही : सागरी सुरक्षेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे
सुभाष कदम - चिपळूण -मुंबईमध्ये पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा संघटनेचे २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी घुसले आणि मोठ्या प्रमाणावर नरसंहार झाला. त्यानंतर सागरी सुरक्षा अत्यंत व्यापक प्रमाणावर राबविण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. मात्र, आजही येथील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर म्हणजे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृह खात्याच्या आदेशानुसार कठोर उपाययोजना करण्याचे कागदोपत्री आदेश दाखल झाले. परंतु, यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा खात्याकडे उपलब्ध नाही. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. स्पीड बोटींची संख्या वाढली. लाईफ जॅकेट, शस्त्र याचा विचार करता अनेक सुविधांची अद्याप वानवा आहे. या बोटीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला निवाऱ्यासाठी पुरेशी जागा नाही. बोटीवर जाताना १२ तासासाठी पुरेल एवढे पाणी आणि जेवणाचा डबा त्यांना घेऊन जावा लागतो. ज्या ठिकाणी लँडिंग पॉईट आहे, तेथे सावली किंवा निवारा नाही.
अनेक वेळा एखादी अडचण निर्माण झाल्यास स्थानिक पोलीस व सागरी सुरक्षा दलाचे कर्मचारी यांच्यात हद्दीवरुन हाणामारी होते. कारवाई नक्की कोणी करायची, यावरुन तू - तू मैं-मैं... अशी स्थिती निर्माण होते. या वादात गुन्हेगाराला सुटका करुन घ्यायला पुरेसा वाव मिळतो. कायद्यातील कच्च्या दुव्यांचा आधार घेत गुन्हेगार मोकाट सुटतात. म्हणूनच स्थानिक पोलीस आणि सागरी सुरक्षा कर्मचारी यांच्यात समन्वय असणे गरजेचा आहे. मुंबईसारख्या ठिकाणी सागरी सुरक्षेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आहेत. त्यांच्यासाठी लँडिंग पॉर्इंट जेथे आहेत त्या सर्व जागा उन्हात आहेत. अनेक वेळा समुद्रात उतरुन त्यांना किनारा गाठावा लागतो. वैयक्तिक स्वच्छतेसाठी बोटीवर त्यांना स्वच्छतागृह नाही. त्यामुळे उघड्यावरच विधी उरकावे लागतात. अनेकवेळा वाऱ्याशी सामना करावा लागतो. बोटीवर असलेले लाईफ जॅकेट जड असते. शिवाय बोटीवर असलेल्या एके-४७ मधून शत्रूवर हल्ला करायचा तर ती बोट स्थिर असणे गरजेचे आहे. परंतु, सध्या अस्तित्त्वात असलेली बोट स्थिर राहात नाही. लाटांच्या हिंदोळ्यावर ती नाचत असते. शिवाय हत्यारे कमालीची जड आहेत. समोरुन बुलेटप्रूफ आहेत परंतु, एखादा शत्रू मागील बाजूने घुसल्यास बोटीवरील सर्व कर्मचारी शहीद होऊ शकतात. अनेक वेळा वादळामुळे त्यांना मान गुडघ्यात घेऊन बसावे लागते. बोटीवर बसण्यासाठी किरकोळ जागा असते. एकूणच सागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या बोटीमध्येही अनेक उणिवा आहेत. कर्मचाऱ्यांना अद्ययावत साधनसामुग्री उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.
सागरी सुरक्षा ही मच्छिमार बांधव, किनारपट्टी भागात असणारे सुरक्षा दल व खबऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने किनारपट्टी भागात काम करणाऱ्या सागरी सुरक्षा दलाच्या जवानांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात. कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यायला हवे. अत्याधुनिक बोटी व त्यासाठी प्रशिक्षित चालक असणे गरजेचे आहे.