मार्कंडी-बहादूरशेख नाका रस्ता चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:42 PM2021-03-12T12:42:37+5:302021-03-12T12:43:57+5:30
Road Sefty Pwd chiplun Ratnagiri-गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांसाठी खडतर प्रवास ठरलेल्या मार्कंडी ते बहादूरशेख नाका रस्ता अखेर चकाचक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला हा रस्ता नगर परिषदकडे वर्ग झाल्यानंतर नुकतेच डांबरीकरण केले आहे. या कामाविषयी येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
चिपळूण : गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांसाठी खडतर प्रवास ठरलेल्या मार्कंडी ते बहादूरशेख नाका रस्ता अखेर चकाचक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला हा रस्ता नगर परिषदकडे वर्ग झाल्यानंतर नुकतेच डांबरीकरण केले आहे. या कामाविषयी येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरातील मार्कंडी ते बहादूरशेख नाकापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे या मार्गावर अपघाताच्या किरकोळ घटनाही घडल्या होत्या. पावसाळ्यात तर खड्ड्यांमधील चिखलमय पाणी पादचाऱ्यांसह अन्य वाहनचालक व प्रवाशांच्या अंगावर उडत होते. यामुळे एकमेकांमध्ये शाब्दिक चकमकीही उडाल्या होत्या. या रस्त्याची दुरवस्था पाहता येथील नागरिकांनी या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. त्यामुळे रस्ता शहरात असूनही नगरपरिषदेला डांबरीकरण करण्यास अडचण येत होती. यामुळे हा रस्ता नगरपरिषदेकडे वर्ग व्हावा, यासाठी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्यासह नगरसेवक व प्रशासनाने प्रयत्न केले. या सर्वांच्या प्रयत्नातून हा रस्ता नगरपरिषदेकडे वर्ग झाला. पर्यायाने डांबरीकरणाचा करण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर नगरपरिषदेने १४ व्या वित्त आयोगांतर्गत मार्कंडी स्वामी मठ ते बहादूरशेख नाका कमानीपर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी १ कोटी १९ लाख २३ हजार ९२२ रुपये मंजूर केले.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह भाजप व महाविकास आघाडी नगरसेवकांच्या उपस्थितीत रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन १७ जानेवारी रोजी झाले. यानंतर काम सुरू झाले. नुकतेच या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
बांधकाम सभापतींच्या पत्राविषयी उलटसुलट चर्चा
रस्त्याचे काम सुरू असताना नगरपरिषदेचे अभियंता, काही नगरसेवकांसह खुद्द बांधकाम समिती सभापती मनोज शिंदे यांनीदेखील या कामाची पाहणी केली होती. असे असताना शिंदे यांनीच आता या रस्त्याच्या कामाबाबत मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. मात्र, या रस्त्याच्या कामाबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत असताना शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीविषयी उलटसुलट चर्चा केली जात आहे.