राजापुरातील बाजारपेठ आठ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:26+5:302021-05-07T04:33:26+5:30
राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केवळ मेडिकल व दूध वगळून सर्व दुकाने ...
राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केवळ मेडिकल व दूध वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राजापूर व्यापारी संघाने घेतला आहे. इतर सर्व दुकाने १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, मुख्याधिकारी देवानंद यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रारंभी व्यापारी संघाने गुरूवारपासून संपूर्ण बाजारपेठ मेडिकल व दूध वगळून बंद ठेवण्याचा पर्याय प्रशासनासमोर ठेवला होता. मात्र, हा पर्याय प्रशासनाने अमान्य करत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे बाजारपेठेतील किराणा दुकानेही बंद राहतील. केवळ घरपाेच सेवाच सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे.
जर कोणी व्यापारी दुकानातून ग्राहकाला माल देताना आढळला किंवा ग्राहकाच्या पिशवीत माल आढळला तर त्याने दुकानदाराचे नाव सांगितल्यावर त्या दुकानदारावर दहा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल. तसेच त्या ग्राहकावरही कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने ही दिनांक १५ मेपर्यंत बंदच राहतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजीपाला, फळे व दूध विक्री ही सकाळी ७ ते ११ यावेळेतच सुरु राहील, त्यानंतर ती दुकानेही बंद करायची आहेत, असे मालपेकर यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. व्यापाऱ्यांनी आपली स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन घरातच थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.