मार्लेश्वर यात्रा रद्द, मार्लेश्वर-गिराजादेवीचा विवाह सोहळा साधेपणाने; गिराजादेवीची पालखी सायंकाळी निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 12:37 PM2022-01-13T12:37:53+5:302022-01-13T12:40:28+5:30
वधू गिरीजाईमातेची पालखी साखरप्यातून आज, (दि.१३) रोजी सायंकाळी २० जणांच्या उपस्थितीतच प्रस्थान करून ती रात्री मार्लेश्वरला येईल.
देवरुख : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार यावर्षी ही मार्लेश्वर यात्रा रद्द करण्यात आली आहे. मार्लेश्वर देवस्थान मानकरी व पुजारी यांचे उपस्थितीत फक्त ५० जणांच्या उपस्थितीत विधी सोहळा होणार आहे.
मार्लेश्वर व गिरीजा विवाह दि. १४ (मकरसंक्रांत) रोजी दुपारी १.२५ वाजता होणार आहे. सर्व विधी कोविड नियमांचे पालन करून ५० मानकरी यांचे मर्यादित उपस्थितीतच पार पडतील. वधू गिरीजाईमातेची पालखी साखरप्यातून आज, (दि. १३) रोजी सायंकाळी २० जणांच्या उपस्थितीतच प्रस्थान करून ती रात्री मार्लेश्वरला येईल.
तसेच देवरूख, वाडेश्वर पालखीसह मरादपूर व आंबव च्या दिंड्याही मर्यादीत भक्त व मानकरी यांचे उपस्थितीत प्रारंभ करतील. व रात्रौच मार्लेश्वर येथे आगमन करतील. या सर्व मानकरींना ५०पास देणेत येणार आहेत. पास असलेल्यांनाच देवस्थान आवारात प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांनी याची नोंद घेवून गर्दी होऊन नियमांचा भंग होऊ नये यासाठी मंदिरात दर्शनाचा व लग्नसोहळ्याचा लाभ न घेता सहकार्य करावे, असे आवाहन सर्व मानकरी यांचेसह पोलिसांनी केले आहे.
इतरत्रहून येणारे मानकरी यांना त्यांच्या विधीसाठी जावे लागेल त्यांना व त्यांच्या गाड्यांना ठराविक पास दिले जातील. त्या व्यतिरिक्त कोणासही कार्यक्रमासाठी पास दिले जाणार नाहीत. त्यामुळे अन्य कोणासही देवस्थान परिसरात जाता येणार नाही. मारळ फाटा व देवस्थान परिसर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे.