विवाह, सत्यनारायण महापूजा ऑनलाईन, तेरावे मात्र प्रत्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:22 AM2021-06-22T04:22:10+5:302021-06-22T04:22:10+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे विवाह, साखरपुडा तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. मोजक्या लोकांच्या ...
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे विवाह, साखरपुडा तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच कार्यक्रम उरकण्यात येत आहेत. वास्तविक ८० ते ९० टक्के कार्यक्रम बंद आहेत. परदेशात असलेल्या उभयतांसाठी साखरपुडा, विवाह ऑनलाईन आयोजित केला जात आहे.
स्थानिकांमध्येही अनेकांनी विवाह सोहळे रद्द केले आहेत. मात्र, ठराविक लग्न सोहळे आयोजित केले जात असले तरी उपस्थितीची मर्यादा पाळण्यात येत आहे. शिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखले जात आहे. मंदिरे बंद असल्यामुळे लघुरूद्र, अभिषेकसारखे धार्मिक कार्यक्रमही बंदच आहेत. श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात येत असली तरी महाप्रसाद ठेवला जात नाही. पूजेला नमस्कार करण्यासाठीही सहसा लोकांना बोलावले जात नाही. घरातील मंडळींमध्येच कार्यक्रम उरकण्यावर भर आहे. काेरोनाच्या धास्तीमुळे गर्दी टाळली जात आहे. वास्तूशांती, गणेशपूजन तर सध्या बंदच आहे.
मृत व्यक्तीचे दहावे, बारावे व तेरावे भटजींना बोलावून उरकण्यात येत असले तरी अगदी जवळच्या नातेवाईकांशिवाय अन्य कोणालाही बोलावणे टाळले जात आहे.
साखरपुडा, विवाह ऑनलाईन
परदेशात नोकरीनिमित्त असलेल्या उभयतांना लग्नासाठी किंवा साखरपुड्यासाठी गावी येणे शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन विवाह, साखरपुडा उरकण्यावर भर दिला जात आहे. यजमानांच्या घरी भटजींना बोलावून मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत साखरपुडा, विवाह सोहळे उरकले जात आहेत. लांबचे नातेवाईकही ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन उभयता व यजमान मंडळींना शुभेच्छा देत आहेत. काही ठिकाणी गणेश पूजन किंवा वास्तूशांती पूजासुध्दा ऑनलाईन आयोजित करण्यात येत आहेत. भटजींच्या सूचनेनुसार यजमान तयारी करत असून, भटजी ऑनलाईन पूजा पठण करून विधी उरकले जात आहेत.
कोरोनामुळे पूजा, अभिषेक, लघुरूद्रसारखे अनेक कार्यक्रम टाळण्यात येत आहेत. मोजकेच कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालनही करण्यात येत आहे. यजमान पूजेला बसले असताना आचमनावेळी मास्क बाजूला काढतात, मात्र नंतर कायम मास्क परिधान करतात. आम्ही मास्क घालूनच पूजा सांगतो.
- चिंतामणी काळे, भटजी
विवाह, साखरपुडासारखे कार्यक्रम आता फार कमी होत आहेत. वास्तूशांती, गणेश पूजन किंवा श्री सत्यनारायण पूजेचे प्रमाणही अल्प आहे. मृत व्यक्तीचे बारावे-तेरावे मात्र एकाच दिवशी उरकण्यात येत असले तरी नातेवाईकांना टाळले जात आहे. मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत विधी उरकले जात आहेत. आरोग्य सुरक्षेमुळे विशेष काळजी घेण्यात येत आहे.
- अभय मुळ्ये, भटजी
पूजेला आले तरी मास्क
- पूजेला बसणारे यजमान व पूजा सांगणारे भटजी मास्क परिधान करत आहेत.
- मोजक्या चार ते पाच लोकांमध्ये पूजा उरकण्यात येत आहे. नमस्कारासाठी येणारी मंडळीही मास्क परिधान करून येतात.
- पूजेला बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या हातावर आधी सॅनिटायझर दिले जात आहे.