अपत्यप्राप्तीसाठी विवाहितेला वेताच्या काठीने बेदम मारहाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:17 PM2017-09-25T23:17:47+5:302017-09-25T23:17:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अटकेत असलेल्या श्रीकृष्ण अनंत पाटील ऊर्फ पाटील बुवाच्या अनेक लीला उघड होत आहेत. अपत्यप्राप्तीसाठी या बुवाने वेताच्या काठीने बेदम मारहाण केल्याची तक्रार करीत एका महिलेने सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली. या महिलेला बुवाविरोधातील प्रकरणात साक्षीदार बनविले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पाटील बुवाविरोधात चार वर्षांपूर्वीही झरेवाडी (ता. रत्नागिरी) येथील स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार आघाडी उघडली होती. मात्र, त्यावेळी पोलिसांकडून सहकार्य मिळाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसे निवेदनही जिल्हा पोलीस अधीक्षकांना दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले आहे. पहिल्यांदा शिवीगाळ करून अर्वाच्य भाषा वापरल्याच्या महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पाटील बुवाला अटक झाली.
जामिनावर मुक्तता झाल्यानंतर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी स्वत:च पाटील बुवाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे दुसºयांदा पाटील बुवाला अटक झाली. २८ सप्टेंबरपर्यंत या बुवाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या पाटील बुवाच्या कारनाम्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. आता आणखी गंभीर गुन्हा दाखल झाल्यास पाटील बुवाला २८ सप्टेंबरनंतर तिसºयांदा अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी त्याच्या खास सेवेकºयांची पोलिसांनी झाडाझडती घेतली असून त्यातील काही आक्रमक सेवेकºयांना अटक होण्याची शक्यता आहे.
घराबाहेर न पडण्याचा बुवांचा आदेश
पाटील बुवाने एका विवाहितेला अपत्यप्राप्तीच्या उपचाराअंतर्गत वेताच्या काठीने बेदम मारहाण केली तसेच तिने आपल्या घराबाहेर येऊ नये, असा अजब आदेश दिला होता, अशी संबंधित महिलेची तक्रार आहे. त्याबाबत तिने पोलिसांना माहिती दिली आहे.
मात्र, याप्रकरणी तिच्या घरच्यांकडून तक्रार दाखल होण्यास विलंब होत आहे. या महिलेने सोमवारी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रसारमाध्यमांनाही याबाबतची माहिती दिली.
कारवाईकडे लक्ष
पोलीस कोठडीत पाटील बुवाला भेटण्यासाठी गेलेल्या पोलीस खात्यातील एका महिलेने बुवांना दोनदा लोटांगण घातले. याप्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली असून आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याबाबतची तक्रारही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली जाणार आहे.