अमर रहे! शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By संदीप बांद्रे | Published: April 4, 2023 05:44 PM2023-04-04T17:44:17+5:302023-04-04T17:44:57+5:30
भारत -चीन सीमेवर रेकी करत असताना झालेल्या भुसख्लनात जवान अजय ढगळे शहीद झाले.
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्यावर आज त्यांचे मूळ गावी चिपळूण तालुक्यातील मोरवणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सुभेदार अजय ढगळे यांची अंत्ययात्रा बहुदूरशेख नाका ते मोरवणे गावापर्यंत काढण्यात आली. यावेळी पोलिस दलाचे स्काऊट देखील अंत्ययात्रेसोबत होते.
अंत्यसंस्कारच्या वेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहीली. पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी ढगळे यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही शहीद सुभेदार ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहत ढगळे परिवाराचे सांत्वन केले.
108 इंजिनिअर रेजिमेंटचे लेफ्टनन्ट कर्नल रोशन चव्हाण, मेजर शिवकुमार एस.एन.,२ STC पणजी गोवा सुभेदार जे. आलम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, उपविभागीय अधिकारी चिपळूण प्रवीण पवार, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, संचालक सैनिक कल्याण विभाग यांच्यावतीने दीपक मोरे यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दाजंली वाहिली. तर उपस्थित इतर मान्यवरांकडून व जनसमुदायांकडून पुष्पचक्र व पुष्पहार पार्थिवावर अर्पित करण्यात आले.
यावेळी पोलीस दल आणि सैन्यदल यांनी शहीद सुभेदार अजय ढगळे यांना प्रत्येकी तीन फेऱ्यांची (फायर) करुन सलामी दिली. पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्या वीरपत्नी अनुजा अजय ढगळे यांना राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक सुर्पूत करण्यात आला. शहीद सुभेदार अजय ढगळे यांच्या अंत्ययात्रेला व अंत्यसंस्काराला मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
भारत -चीन सीमेवर रेकी करत असताना झालेल्या भुसख्लनात जवान अजय ढगळे शहीद झाले. त्यांचे पार्थिव काल, सोमवारी रत्नागिरी येथे आणण्यात आले होते. त्यानंतर आज, मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या मोरवणे गावी पार्थिव आणले. शहरातील बहाद्दूरशेखनाका येथून सजवलेल्या लष्करी वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. चौका-चौकात श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. अंत्ययात्रेत अमर रहे, अमर रहे, अजय ढगळे, अमर रहे, भारतमाता की जय, अशा घोषणा देण्यात येत होत्या. त्यानंतर बहादूरशेखनाका येथून कळबंस्ते ते मोरवणे मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरीक जमले होते.