मास्कमुळे चेहऱ्यावर उठतोय पुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:07+5:302021-07-28T04:33:07+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर अपरिहार्य आहे. मात्र, मास्कसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या कापडामुळे काहींना त्रास होत ...
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर अपरिहार्य आहे. मात्र, मास्कसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या कापडामुळे काहींना त्रास होत आहे. त्यामुळे मास्क लावलेल्या भागाला खाज सुटणे, तो भाग लाल होणे, पुरळ होणे, भाग काळा पडणे आदींचा त्रास होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे मास्क वापरताना पूर्णपणे काॅटनचा असलेला आणि नेहमी जंतुविरहित पाण्याने धुतलेला असा मास्क वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
मास्क आवश्यकच, पण असे करा त्वचेचे रक्षण..!
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक आहे. मात्र, तो वापरताना पूर्णपणे कापडी असावा. मास्क लावल्यानंतर तो सतत काढू नये. भिजलेला मास्क लावल्यास चेहऱ्याला खाज सुटते. कापडी मास्क स्वच्छ धुऊन निर्जंतुक करून वापरावा.
त्वचाविकाराचे रुग्ण वाढले
मास्क अधिक आवळलेला असेल, तर त्यामुळे चेहऱ्यावर पुटकुळ्या होऊन त्या चिघळण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मास्क काॅटनचा स्वच्छ निर्जंतुक केलेला असा हवा. नाक आणि तोंड झाकणारा, पण घट्ट लावलेला असा असू नये.
- डाॅ. सुधांशू मेहता, त्वचा रोग तज्ज्ञ
मास्कमुळे ओठाच्या खाली खाज सुटणे, गालावर लालसरपणा येणे या तक्रारी वाढू लागल्या आहेत. काही वेहा धुताना त्यात डिटर्जंट राहणे, तोच तोच मास्क वापरणे, यामुळेही त्रास होतो.
डाॅ. अरुण राठोडकर, त्वचा रोग तज्ज्ञ
सॅनिटायझरपेक्षा साबण बरा
सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा त्वचेला त्रास होतो. त्वचा कोरडी होऊन हाताला खाज सुटते. काहींच्या हाताचे पापुद्रे निघू लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे सॅनिटायझर हाताला हानिकारक असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून बचाव करतान हात स्वच्छ करताना वारंवार सॅनिटायझर वापरू नये. त्याऐवजी हात साबणाने आणि पाण्याने सतत धुवावेत, त्यामुळे असा त्रास होणार नाही, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातून देण्यात येत आहे.