मास्कमुळे लिपस्टिकची लाली गेली काळवंडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:38+5:302021-04-30T04:40:38+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे नागरिकांना सक्तीने मास्क वापरावा लागत आहे. मास्क नसेल तर २०० रुपयांचा दंड पोलिसांना द्यावा ...
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे नागरिकांना सक्तीने मास्क वापरावा लागत आहे. मास्क नसेल तर २०० रुपयांचा दंड पोलिसांना द्यावा लागत आहे. महिला वर्गालाही आता बाहेर पडताना मास्क वापरावा लागत असल्याने, लिपस्टिक वापरणाऱ्या महिलांना मास्कमुळे अडचणीचे होत आहे. मास्कमुळे लिपस्टिक पुसली जात असल्याने आता साैंदर्यप्रसाधनातून सध्या तरी लिपस्टिक बाहेर पडली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने नागरिकांना मास्क, सॅनिटायझर यांच्यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक केले आहे. मास्क न वापरता फिरणाऱ्यांकडून २०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. त्यामुळे लहान-थोर मास्क वापरू लागले आहेत. मात्र, ज्या मुली किंवा महिलांना बाहेर पडताना लिपस्टिक लावण्याची सवय आहे, त्यांची लिपस्टिक मास्कमुळे पुसली जात असल्याने लिपस्टिक लावाच कशाला, असे म्हणत अनेकींनी लिपस्टिकचा वापरच सोडून दिला आहे. मात्र ड्रेस अथवा साड्यांच्या रंगाच्या मास्कची फॅशन आली आहे.
२४ तास घरातच, ब्युटीपार्लर हवे कशाला...?
सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने सर्व व्यवहार थांबले आहेत. उद्योग - व्यवसायांबरोबरच सर्व प्रकारचे कार्यक्रमही थांबले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांना घरातच थांबणे सक्तीचे केले आहेत. आता कुठे बाहेर जाणे नाही, की कार्यक्रम नाही. त्यामुळे महिलाही २४ तास घरातच राहत असल्याने त्यांना मेकअप् किंवा लिपस्टिक हवीच कशाला?
- ब्युटीशियन, रत्नागिरी
आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसावे, आपण चारजणींमध्ये उठून दिसावे, असे प्रत्येक युवती - महिलेला वाटत असते. त्यामुळे सध्या ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या युवतींबरोबर सर्व वयाेगटातील महिलांची संख्या वाढली आहे. सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू असल्याने नोकरदार महिला वगळता इतर महिला घरातच आहेत. काही नोकरदार महिलांना लिपस्टिकची सवय आहे. मात्र, आता मास्क असल्याने लिपस्टिक पुसली जात असल्याने अनेकींनी ती लावणेच सोडले आहे.
- ब्युटीशियन, रत्नागिरी
लिपस्टिकचा वापर कमी
सध्या कोरोनाने सर्वच विस्कळीत केले आहे. लग्नसमारंभ बंद झाल्याने आता काॅस्मेटिकची खरेदीही बंद आहे. गेले वर्षभर मास्क वापरणे बंधनकारक केल्याने, लिपस्टिक लावून वाया का घालवा, असा विचार आता महिला करतात. मात्र, मॅचिंगच्या मास्कची खरेदी आवर्जून करतात.
- एक विक्रेता, रत्नागिरी
लिपस्टिक सध्या बंद
कोरोनाची खबरदारी म्हणून वर्षभर मास्क वापरावा लागत आहे. त्यामुळे कार्यक्रमात किंवा नेहमी बाहेर पडताना लिपस्टिक वापरली तरीही ती पुसून जाते. बाहेर पडताना मास्क तर अनिवार्य आहे. त्यामुळे आता लिपस्टिक लावणेच सोडले आहे.
- विरश्री संगमनेरकर, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, रत्नागिरी
घरात लिपस्टिक वायाच
सध्या घरातच राहावे लागत आहे. कोरोनाने सर्व लग्नसमारंभ, वाढदिवस, सण, सोहळे आदी बंद करायला लावलेत. त्यामुळे मेकअप् करणे तर दूरच, पण मास्कमुळे आता लिपस्टिक लावण्याचाही काही उपयोग होत नाही. लावलेली लिपस्टिक वायाच जाते. शिवाय घरात लिपस्टिक कशाला?
- तेजा सावंत, रत्नागिरी