अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:40+5:302021-04-14T04:28:40+5:30
खेड : तालुक्यातील धामणंद परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवेळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
खेड : तालुक्यातील धामणंद परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवेळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका हापूसला बसला. सुमारे दीड तास निसर्गाचे तांडव सुरू होते.
दोन दिवस वातावरण ढगाळ होते. रविवारी दुपारपासूनच धामणंद परिसरात वातावरण पावसाळी झाले होते. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली. सोबत सोसाट्याचा वाराही होता. या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. जनावरांची वैरण भिजली. हापूसला तर जोरदार फटका बसला. एकतर यावर्षी हापूसचे पीक अतिशय कमी आहे. जे आहे ते वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करत आहेत, मात्र या वादळी पावसाने या परिसरातील हापूस बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
वाऱ्यामुळे आंबा गळून गेला आहे.
काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून जाणे, गोठ्याचे छप्पर उडणे, घरावरील कौले उडून जाणे अशा घटना घडल्या आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे शेतकरी गलितगात्र झाला आहे, त्यात आता निसर्गही मागे लागला असल्याने शेतकऱ्यांनी करायचे तरी काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तहसील कार्यालयात संपर्क साधला असता पंचनामे सुरु झाले असून लवकरच झालेल्या नुकसानाचा अहवाल शासनाला सादर केला जाईल, असे सांगण्यात आले.
.................
खेड तालुक्यातील धामणंद विभागात वादळामुळे पत्रे उडून जाणे अशा घटना घडल्या आहेत.