निव्वळ आवाजावरच खेळला ‘त्यां’नी क्रिकेट स्पर्धेतील सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:38 PM2019-06-02T23:38:59+5:302019-06-02T23:39:03+5:30
अरुण आडिवरेकर । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : क्रिकेट हा सर्वांचाच आवडीचा खेळ आहे. अंगाने सुदृढ असणारी सर्वच मुलं ...
अरुण आडिवरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : क्रिकेट हा सर्वांचाच आवडीचा खेळ आहे. अंगाने सुदृढ असणारी सर्वच मुलं क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतात. पण अंध मुलांनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला, असे सांगितले तर तुम्हाला खरे वाटेल का? पण रत्नागिरीतील क्रीडांगणावर रविवारी अंध मुलांनीही क्रिकेटचा सामना खेळून आम्हीही काही कमी नसल्याचे दाखवून दिले.
क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लार्इंड आॅफ महाराष्ट्र यांच्यातर्फे रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात निमंत्रित अंधांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील अंध मुलांनी सहभाग घेतला होता. रत्नागिरी आणि रायगड या दोन संघांमध्ये हा सामना खेळविण्यात आला.
या सामन्याच्यावेळी संस्थेचे सचिव रमाकांत साटम, खजिनदार दादाभाऊ कुटे, प्रशिक्षक अजय मुनी, आस्था फाऊंडेशनच्या सचिव सुरेखा पाथरे, विशाल मोरे, रूपेश पाटील उपस्थित होते. या सर्वांनी या खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
केवळ आवाजाच्या सहाय्याने ही मुलं क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत होती. क्रिकेट स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंसह इतरांमध्येही कमालीचा उत्साह पाहायला मिळत होता. या सामन्याचे समालोचन करण्याचेही काम हीच मुलं करत होती. क्रिकेटसाठी वापरण्यात येणारा चेंडू विशिष्टप्रकारे तयार केला जातो. सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या चेंडूमध्ये छरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे तो खाली पडताच त्याचा आवाज येतो आणि मग हा चेंडू बॅटच्या सहाय्याने पटकावला जातो. क्रिकेट सामन्यात सहभागी होणाऱ्या मुलांचे बी १, बी २, बी ३ असे वर्गीकरण केले जाते. या वर्गीकरणानुसार त्यांचा संघात समावेश करण्यात येतो.
तसेच त्यांची नावे कळण्यासाठी त्यांच्या टी - शर्टवर क्रमांक टाकलेले असतात. त्या क्रमांकानुसार त्या खेळाडूचे नाव कळते. हा खेळ पूर्णत: आवाजावर खेळला जात असल्याने तसेच प्रशिक्षण त्यांना दिले जाते. चेंडूमध्ये छरा टाकून तो आवाज त्यांच्या ओळखीचा केला जातो. त्यामुळे चेंडू जमिनीवर पडताच त्याकडे सर्वांचे लक्ष जाते. तसेच खेळासाठी तयार करण्यात आलेले स्टंप हे ‘मेटल’चे तयार केलेले असतात. या स्टंपला बेल्स एकत्रित अडकविलेल्या असतात. यष्टीरक्षक त्यांना हात लावून विशिष्ट आवाज देतो. त्यानंतर यष्टीरक्षक ‘रेडी’ असे सांगतो आणि मग गोलंदाज ‘तयार’ असे सांगतो. त्यावेळी फलंदाज तयार म्हणताच गोलंदाज चेंडू टाकतो. हा चेंडू बॅटने मारताच त्या दिशेने खेळाडू धावत सुटतात. केवळ आवाजाच्या दिशेने ही मुले खेळताना पाहून त्यांचे कुतूहल वाटते. शिवाय तेही या खेळाचा आनंद लुटताना दिसतात. मग उन्हाचीही पर्वा ते करताना दिसत नाहीत. या सामन्यातून अंधांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी खेळांडूंची निवड करण्यात येणार आहे.