आठवणीतील मे महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:24+5:302021-05-01T04:29:24+5:30

त्या काळातली आठवते आमच्या साडवली गावची नदी. आम्ही तिला देवकोड म्हणतो. या नदीला मेच्या शेवटपर्यंत अथांग पाणी असायचे. ...

May the month of remembrance | आठवणीतील मे महिना

आठवणीतील मे महिना

Next

त्या काळातली आठवते आमच्या साडवली गावची नदी. आम्ही तिला देवकोड म्हणतो. या नदीला मेच्या शेवटपर्यंत अथांग पाणी असायचे. या नदीला बांध घालून मासे पकडण्याचा आमचा मे महिन्यातील नित्यक्रम होता. मासे उपसणे हा त्यावेळचा प्रचलित शब्दप्रयोग होता. गावात आलेले अनेक चाकरमानी मासे उपसण्याचा आनंद घ्यायचे. त्यावेळची खळखळणारी नदी पाहून मन तृप्त व्हायचे. तासन् तास नदीच्या डोहात डुंबण्याचा त्यावेळचा आनंद विरळाच होता. नदीच्या काठावरील पायरी या वृक्षावरून नदीच्या डोहामध्ये उड्या मारण्याची आमची स्पर्धाच लागलेली असायची.

त्या वेळचा एक प्रसंग आठवतो. बापू, बंड्या, गण्या, पांड्या, रम्या, मकरंद, देव्या, उदय, संदीप, मया असे आम्ही सर्वजण नदीमध्ये पोहत होतो. मी पायरीवर चढलो होतो आणि बघतो तर काय? एक भला मोठा साप पायरीच्या बुंध्यावरून वर येत होता. बोबड्या संदीपची नजर गेली. तो मोठ्याने ओरडला, ‘‘बाबयी..बाबयी…अये अये मोता थाप…मोता थाप.’’ माझी बोबडीच वळली. साऱ्यांची नजर त्या सापाकडे गेली. साप वर येत होता. माझे पाय भीतीने थरथर कापत होते. जसजसा साप जवळ येऊ लागला, तसा मी खूपच घाबरलो. बंड्या म्हणाला, “घाबरू नकोस. बाबली बिनधास्त पाण्यात उडी मार.’’ मी श्वास रोखून देवी वाघजाईचे नाव घेतले आणि पाण्यात उडी मारली. त्यानंतर, सर्वांनी तिथून पळ काढला.

मे महिन्यातील आम्हा मुलांचे आवडते ठिकाण म्हणजे ‘वाकडा फणस’. या फणसावर वाडीतील सर्व लहान-मोठी मुले खेळायला यायची. हा फणस अनेक वर्षं ताठ उभा होता. एका वादळात तो खाली पडला. तो तसाच आडवा वाढला आणि त्याला वाकडा फणस हे नाव पडले. या फणसाच्या चारी बाजूला आंब्याची झाडे होती. त्यामुळे या ठिकाणी गर्द सावली कायमस्वरूपी असायची. या वाकड्या फणसाखाली आम्ही रिंगणातून काजू उडवणे, कापडी चेंडूची आबादुबी, करवंटीच्या लगोरी फोडणे, रिंगणातून काठी बाहेर काढणे, डोंगर की पाणी, सुरपारंब्या, विष-अमृत असे अनेक खेळ खेळायचो. छोटीछोटी मुले या फणसावर घसरगुंडी खेळायची. मे महिन्यात हा वाकडा फणस गजबजून जायचा. फणसही आनंदून जायचा. प्रत्येकाला मे महिना कधी येतोय आणि वाकड्या फणसावर जाऊन मजा करतोय, असे वाटायचे. वाकडा फणस आम्हा मुलांसाठी स्वर्ग वाटायचा.

आंब्याच्या झाडाखाली मुलांची खूप गर्दी असायची. सोसाट्याचा वारा आला की, आंबे जमा करायला आमची स्पर्धा लागायची. आमच्या घराजवळ असणाऱ्या काप्याआंब्याजवळ खूप मुली जमायच्या. बाहेरून पिवळाधम्मक दिसणारा कापाआंबा आतून लालभडक होता. तो खूपच रसाळ होता. एका वाऱ्याच्या झुळकीने पटापट ५० आंबे पडायचे. आंबे जमा करताना सर्वच मुलांची झटापट व्हायची. या धडपडीला खूप मजा यायची. आम्ही सर्वच मुले आंबे जमा करून रास घालायचो. या जमा केलेल्या आंब्यापासून माझी आई पन्हं, साठ, आंबापोळी करायची. सकाळी आम्हाला एकच काम असायचे, आंब्याचा रस काढणे व साठ वाळत टाकणे.

करवंदीच्या जाळीवरील काळीभोर करवंदे खाण्यासाठी आम्ही तुटून पडायचो. चादाडीच्या पानांमध्ये ती करवंदे जमा करायची आणि घरी आणायची. काजूची पिवळीधमक बोंडे जमा करून ती मीठ लावून खायची. बरका फणस फोडल्यावर अंगणात एकत्र बसून सर्वजण त्यावर ताव मारायचे. फणसाचे चार्खंड कधी संपायचे ते कळायचे नाही. सायंकाळी अंगणात फणसाची भाजी खातखात गप्पा मारायच्या. गप्पा रंगात आल्या की, मग आई अनेक गोष्टी सांगायची. आईची गोष्ट ऐकत आम्ही कधी झोपी जायचो, ते कळायचेच नाही.

त्याकाळी मनोरंजनाची साधने नव्हती. त्यामुळे शिरीभाऊंच्या वाड्यामध्ये आम्हा मुलांचे नमन सुरू असायचे. यामध्ये उप्या गवळण, विजू श्रीकृष्ण, उदय पेंद्या, सुन्या राजा, भार्गव नटवा बनायचे. मला शिपायाचे काम असायचे. रावणाची पाटी अनिल गुरव नाचवायचा. अशाप्रकारे नमनाची रंगीत तालीम दररोज सुरू असायची आणि वाढीच्या पूजेला हे आमचे संगमेश्वरी नमन सादर व्हायचे. यामध्ये तलवारी, राजाचा ड्रेस, मुकुट, कृष्णाचा ड्रेस, गणपतीचे सोंग, रावणाची पाटी हे सर्व आम्ही मुलेच बनवायचो. यातून पुढे अनेक चांगले कलाकार निर्माण झाले. रवींद्र (बापू) जाधव आज नाटकात काम करतोय. उपेंद्र जाधव भजनीबुवा म्हणून प्रसिद्ध आहे.

काळाच्या ओघात या सर्व गोष्टी मागे पडत चालल्या आहेत. शहरीकरणामुळे गावातील नैसर्गिकता संपत आहे. माणसामाणसांमधील आपुलकी, प्रेम कमी होत आहे. मोबाइलमुळे मुलांचे मैदानी खेळ खेळणे कमी झाले आहे. नदीला नैराश्याचे रूप निर्माण झाले आहे. वाकडा फणस गडप झाला आहे. हे सर्व दृश्य पाहिल्यावर मला माझा पूर्वीचा मे महिना हवाहवासा वाटू लागतो आठवणीमध्ये मन डुंबून जाते. मे महिना जवळ येऊ लागला की, मला नेहमी वाटते, पूर्वीसारखा मे महिना कधी येईल का? आमचा नमनाचा वग होईल का?

- संताेष जाधव, चिपळूण

Web Title: May the month of remembrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.