चिपळूणच्या नगराध्यक्ष दाद मागणार जनतेच्या दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 04:50 PM2020-10-30T16:50:23+5:302020-10-30T16:51:15+5:30
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष विकोपाला गेला आहे. अशातच शहरात भाजपच्या संपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी या अभियानाच्या माध्यमातून आपण केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहेत. शिवाय महाविकास आघाडीच्या आरोपांना थेट जनतेच्या दरबारात उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
चिपळूण : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष विकोपाला गेला आहे. अशातच शहरात भाजपच्या संपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी या अभियानाच्या माध्यमातून आपण केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहेत. शिवाय महाविकास आघाडीच्या आरोपांना थेट जनतेच्या दरबारात उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
अवघ्या काही महिन्यांवर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक येऊन ठेपली आहे. शहरात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन प्रतिस्पर्धी पक्षांनी एकत्रित येत भाजपला रोखायचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षांना लक्ष्य करण्यात आले आहे.
संख्येच्या बळावर विकासकामेही रोखली जात आहेत. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून नगर परिषद फंडातून होणारी कामे थांबली आहेत. मागील निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी शहरातील रस्ते कामांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून ती कामे थांबवली होती.
आता महाविकास आघाडीने संख्याबळाच्या जोरावर विकासकामे थांबवून त्याचे खापर भाजपवर फोडण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, नगराध्यक्षांनी दोन पावले पुढे जात आपण मागील चार वर्षात किती कामे केली ते सांगताना आपल्याला कोणी आणि कसा विरोध केला, महिला नगराध्यक्ष असताना आपल्याला किती संघर्ष करावा लागला, याची माहिती संपर्क अभियानाच्या माध्यमातून मतदारांना देण्यास सुरुवात केली आहे.
या संपर्क अभियानाचा प्रारंभ नगराध्यक्षा खेराडे यांनी अपक्ष नगरसेवक अविनाश केळस्कर यांच्या प्रभागातून केला आहे. केळस्करांच्या प्रभागात जावून नगराध्यक्षांनी त्यांच्यावरच तोफ डागली आहे. भाजपचे शहरप्रमुख आशिष खातू, नगरसेविका रसिका दांडेकर यांना घेऊन त्यांनी बहादूरशेख नाका, वडार कॉलनी, काविळतळी येथे मतदारांच्या बैठका घेतल्या. यावेळी खेराडे यांनी आपल्यावरील विरोधकांच्या आरोपांचे खंडनही केले.