Ganeshotsav 2024: रत्नागिरीतील मयूर भितळे यांच्या चलचित्र देखाव्यात शेतकऱ्यांच्या व्यथा
By शोभना कांबळे | Published: September 9, 2024 06:18 PM2024-09-09T18:18:25+5:302024-09-09T18:18:50+5:30
रत्नागिरी : गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा वापर करून रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर सुरेश भितळे या ...
रत्नागिरी : गणेशोत्सव सामाजिक प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचा वापर करून रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील मयूर सुरेश भितळे या तरुणाने शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित चलचित्र देखावा साकारला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा हा देखावा गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच भक्तांना पाहण्यासाठी खुला केला आहे. हा देखावा अनंत चतुर्दशीपर्यंत (१७ सप्टेंबर) पाहता येणार आहे.
मयूर भितळे इलेक्ट्रिशियन आहेत. गेली सहा वर्षे ते विविध विषयांवर देखावे सादर करीत आहेत. गोवर्धन पर्वत, शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू यांना पावनखिंडीत ठेवून विशाळगडाकडे केलेली कूच, नारळातील गणपती आदी हुबेहूब देखावे त्यांनी केले आहेत. चलचित्र देखावा त्यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदाच केला होता. अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सकपाळ यांच्या जीवनातील प्रमुख चार कष्टप्रद घटनांवर आधारित चलचित्र देखावा मयूर भितळे यांनी गतवर्षी केला होता. त्यांच्या या देखाव्याची प्रशंसाही झाली होती.
या चलचित्र देखाव्यातून प्रेरणा घेऊन यंदा भितळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्या देखाव्यातून मांडल्या आहेत. कोकणातील शेती आता अनिश्चित झाली आहे. पाऊस लहरी झाल्याने शेती चांगली होईल, याची शाश्वती नाही, तर काही वेळा त्याच्या जमिनीवरच अतिक्रमण करून बांधकामे उभारली जात आहेत. यातूनच आता शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आली असून, शेतकऱ्यांची मुले आता रोजगारासाठी गाव सोडून शहरात जात आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मयूर भितळे यांनी त्यांच्या या व्यथा या चलचित्र देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मयूर भितळे यांनी अतिशय अल्प कालावधीत हा देखावा तयार केला आहे. यासाठी त्यांना अनिकेत बाणे, मारुती लोहार, सौरभ मांडवकर, अभिजित आलीम यांचे सहकार्य मिळाले, तसेच रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल योगेश सुरेश दोरखंडे यांनी विशेष साहाय्य केले.