Ratnagiri crime: वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी २० हजाराच्या लाचेची मागणी, वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहाथ जाळ्यात
By अरुण आडिवरेकर | Published: April 27, 2023 04:20 PM2023-04-27T16:20:19+5:302023-04-27T17:11:28+5:30
दापोली उपजिल्हा रुग्णालयात 'एसीबी'ने केली कारवाई
दापाेली : वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी लाच घेणाऱ्या दापाेली उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग - २चे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेश दत्तात्रय कुराडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पडकले. ही कारवाई आज, गुरुवारी (दि.२७) सकाळी करण्यात आली.
दापाेलीतील एका २९ वर्षीय तरुणाने याबाबत तक्रार दिली हाेती. या तरुणाच्या वडिलांनी शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी अर्ज दाखल केला हाेता. त्यासाठी वडिलांचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र आवश्यक हाेते. या प्रमाणपत्रासाठी हा तरूण दापाेली उपजिल्हा रुग्णालयात गेला हाेता. त्याठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुरेश कुराडे यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. या रकमेबाबत तडजाेड केल्यानंतर १८ हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या रत्नागिरी कार्यालयातर्फे गुरुवारी सापळा रचण्यात आला. ही रक्कम घेऊन तरुण दापाेली उपजिल्हा रुग्णालयात गेला हाेता. त्याठिकाणी ही रक्कम स्वीकारताना डाॅ. सुरेश कुराडे यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक सुनील लाेखंडे, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पाेलिस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी केली. या पथकात पाेलिस निरीक्षक प्रवीण ताटे, पाेलिस हवालदार विशाल नलावडे, पाेलिस नाईक दीपक आंबेकर, चालक पाेलिस नाईक प्रशांत कांबळे यांचा समावेश हाेता.