हापूसमधील साक्यावर आता औषध उपलब्ध : व्ही.रविंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:13 PM2019-02-07T12:13:05+5:302019-02-07T12:16:20+5:30
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे केलेले प्रयोग यशस्वी झाले असल्याची माहिती भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्था, बंगळुरूचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी दिली.
रत्नागिरी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, बंगळुरूने आंब्याच्या आतील भागात होणारा साका टाळण्यासाठी अर्क साका निवारक हे पर्यावरणपूरक औषध जगात प्रथमच विकसित केले आहे. गेल्या चार वर्षात या औषधामुळे आंब्यातील साका टाळण्यात यश आले असून, कोकणातील रत्नागिरी, देवगड येथे केलेले प्रयोग यशस्वी झाले असल्याची माहिती भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्था, बंगळुरूचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. रवींद्र यांनी दिली.
कृषी पणन मंडळ, सुपर मार्केटिंग ग्रोसरी सप्लाईज प्रा. लि. व भारतीय बागवानी अनुसंधान संस्था, बंगळुरू यांच्या विद्यमाने हापूस आंब्यातील साका निर्मूलन उपाययोजना या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळू ढवळे, उपसभापती संजय आयरे, माजी सभापती मधुकर दळवी, रत्नागिरी आंबा उत्पादक संघाचे प्रकाश साळवी, सुपर मार्केटिंग ग्रोसरी सप्लाईज प्रा. लि.चे व्यवस्थापक विनोद कुमार, विभागीय व्यवसाय अधिकारी रूपेश सयाल आणि कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते.
सन २०१४मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने अर्क साका निवारक हे औषध तयार केले. त्यानंतर सन २०१५ मध्ये कृषी पणन मंडळ यांच्या सहकार्याने कोकणातील शंभरहून अधिक बागांमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांचे समाधान झाले असून, फळाची उत्तम गुणवत्ता मिळतानाच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादित मालाला चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुप्पट उत्पन्न मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
साका निवारण्याची पध्दत
साका निवारणाच्या दोन पध्दती आहेत. त्यामध्ये एक फवारणीद्वारे, तर दुसऱ्या पध्दतीत फळ द्रावणात बुडविण्यात येते. काढणीपूर्व फळे बुडविण्यासाठी २० ते २५ फुटापर्यंत नवे साधन विकसित करण्यात आले आहे. उर्वरित उंचीच्या झाडांसाठी फवारणीद्वारे औषधांचा वापर करता येणार आहे. साकामुळे वाया जाणाऱ्या आंब्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.