पर्यटन विकासासाठी वित्तमंत्र्यांना भेटणार
By admin | Published: July 29, 2016 11:01 PM2016-07-29T23:01:47+5:302016-07-29T23:18:07+5:30
मुंबईत बैठक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व आमदारांचा निर्णय
रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाने अद्याप निधी दिला नसल्याने आता या निधीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार पुढच्या आठवड्यात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, संजय कदम, विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, तसेच विविध खात्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासासाठी ६७० कोटींचा पर्यटन विकास आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. या आराखड्यातील प्राधान्यक्रमाने करावयाच्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८० कोटींच्या आराखड्याची यादीही शासनाला देण्यात आली आहे. मात्र, या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे ही कामे कागदावरच आहेत. या निधीसाठी पुढच्या आठवड्यात रवींद्र वायकर यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी घेतला आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या प्राधान्यक्रमाच्या ८० कोटींच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जिल्ह्यातील पर्यटकांच्या वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोणत्या उपाययोजना केल्या, याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश
वायकर यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन विकासाबाबत मुंबई येथे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्वश्री आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, संजय कदम, हुस्नबानू खलिफे, तसेच जिल्हाधिकारी प्रदीप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आदी उपस्थित होते.