रत्नागिरीत भेट झाली हो देवांची.. श्रीदेव भैरव - काशीविश्वेश्वर भेटीचा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 02:11 PM2019-08-13T14:11:07+5:302019-08-13T14:12:52+5:30
रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील श्री देव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरवच्या पालखी भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी विश्वेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
रत्नागिरी : शहरातील राजीवडा येथील श्री देव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरवच्या पालखी भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी विश्वेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
श्रावणाच्या पहिल्या सोमवारी श्री देव काशीविश्वेश्वर मंदिर व मांडवी येथील श्रीदेव भैरव मंदिरामध्ये नामसप्ताहाला प्रारंभ होतो, तर श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी या सप्ताहाची समाप्ती होते. सप्ताहाच्या समाप्तीनंतर दोन्ही मंदिरांमध्ये पालख्यांमधून देवतांची मिरवणूक काढण्यात आली.
मांडवी येथील श्री देव भैरव राजीवडा येथे काशीविश्वेश्वराच्या भेटीला येतो. काशीविश्वेश्वराच्या नामसप्ताहाची सांगता सोमवारी दुपारी १२.३० वाजता झाल्यानंतर पालखी मंदिराबाहेर येते व मंदिराच्या आवाराबाहेरील घाटीवरुन पाच प्रदक्षिणा घालते. पालखीच्या तिसऱ्या प्रदक्षिणावेळी श्री भैरीच्या पालखी भेटीचा हा सोहळा रंगला.
मांडवीतील भैरव देवाची पालखी मंदिरातून बाहेर पडल्यावर भडंगनाका, ८० फुटी हायवे नाका, बंदररोड, मुरलीधर मंदिर, काँग्रेसभवन, विठ्ठल मंदिर, धमालणीचा पार, गोखले नाका, मारुती आळीतील मंदिर, पुन्हा गोखले नाकामार्गे, राधाकृष्ण नाका, रामआळी, तेलीआळीमार्गे खडपेवठार येथून विश्वेश्वर घाटीवरुन आली. या घाटीमध्येच दोन्ही पालख्यांचे विणेकरी, मानकरी यांच्या भेटी झाल्यावर पालखी भेटीचा सोहळा रंगला. यावेळी भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी टाळ-मृदुंगांचा आवाज, ढोल-ताशांचा गजर व भजनामध्ये भाविक दंग झाले होते. सोमवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पालखी भेटीचा हा सोहळा रंगला. पालखी भेट झाल्यानंतर दोन्ही पालख्यांच्या मानकऱ्यांनी श्रीफळ देऊन देवाची भेट घडवून आणली. यावेळी भक्तांची गर्दी अधिक होती.
पालखी मंदिरात
गाऱ्हाणे झाल्यावर श्री भैरवाची पालखी खडपेवठार, चवंडेवठार, विलणकरवाडी, घुडेवठार, दत्तमंदिरमार्गे मांडवी येथील मंदिरात गेल्यानंतर नामसप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर दोन प्रदक्षिणा पूर्ण करत काशीविश्वेश्वराची पालखी मंदिरामध्ये विसावली.