पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार
By मनोज मुळ्ये | Published: January 8, 2024 07:17 PM2024-01-08T19:17:22+5:302024-01-08T19:17:41+5:30
'निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करु, असे इकडे तिकडे सांगतात. अशा लोकांना कालमर्यादा द्यावी'
राजापूर : यापूर्वी शिवाजी पार्कवर ज्यांच्या दणदणीत सभा होत होत्या, त्यांच्यावर चावडीवर बैठका घेण्याची वेळ आली, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. आगामी निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांची अनामत रक्कमही जप्त होईल, असा दावा त्यांनी केला.
राजापुरातील राजीव गांधी मैदानावर शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानांतर्गत सभेत ते बोलत होते. यापूर्वी १९९० साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजापूरला विशाल जाहीर सभा झाली होती. त्यानंतर कोकणातील राजकीय चित्र बदलले आणि शिवसेनेचे सर्वच आमदार विजयी झाले होते. शिवसेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ राजापुरातून रोवली गेली होती, याची त्यांनी आठवण करुन दिली.
मागील १५ महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती शासनाने अनेक विकासात्मक निर्णय घेतले. कोकणाला खऱ्या अर्थाने न्याय देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले. रत्नागिरीत सुमारे ५२२ कोटी रुपयांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गती मिळाली व ते सुरुही झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत आपलाच खासदार निवडून येईल आणि विरोधकांची अनामत रक्कमही घालवली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पालकमंत्री सामंत यांनी यावेळी महायुती सरकारने केलेल्या कामांचा विस्तृत उल्लेख केला. आंबा, काजू बोर्डसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका आणि त्यासाठी मंजूर केलेला निधी यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
सामंत यांचा रोख कोणाकडे
काहीजण आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे आहोत. निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करु, असे इकडे तिकडे सांगतात. अशा लोकांना कालमर्यादा द्यावी, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यांचा रोख नेमका कोणावर होता, याची चर्चा आता राजापुरात सुरू झाली आहे. हा टोला राजापूरवरुनच हाणलेला नाही ना, असा प्रश्नही आता राजकीय कार्यकर्ते आपापसात करत आहेत.
रिफायनरी, उमेदवारी हे विषय बाजूलाच
राजापूर तालुक्यात बहुचर्चित आणि लांबकळत राहिलेली रिफायनरी तसेच शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या विधानांमुळे चर्चेत आलेली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी या दोन्ही विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीतरी भाष्य करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी सफाईने हे दोन्ही विषय टाळले.
समर्थक, विरोधक मुख्यमंत्र्यांना भेटले
रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन प्रकल्प समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही गटांमधील लोकांनी राजापूर विश्रामगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट स्वतंत्रपणे घेतली. दोन्ही बाजूच्या लोकांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केले आहे. मात्र यावेळी कोणती चर्चा झाली, त्याचा तपशील अजून पुढे आलेला नाही.
अनेकांचा पक्षप्रवेश
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यावेळी काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, रवींद्र बावधनकर, पाचलचे माजी विभागप्रमुख गोपीनाथ उर्फ आप्पा साळवी, तळवडेच्या लोकनियुक्त सरपंच गायत्री साळवी व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.