पोलिसांनी बोलावलेली बैठक निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2016 11:19 PM2016-03-24T23:19:41+5:302016-03-24T23:40:31+5:30

देहेण प्रकरण : देवस्कीच्या कारणावरून कुटुंबाला टाकले वाळीत

The meeting called by the police was in vain | पोलिसांनी बोलावलेली बैठक निष्फळ

पोलिसांनी बोलावलेली बैठक निष्फळ

Next

शिवाजी गोरे-- दापोली तालुक्यातील देहेण गावातील समाजाला काळीमा फासणाऱ्या प्रकारामुळे संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. ‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांनी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली.
देहेण गावातील तुकाराम जगदाळे यांना पाच वर्षापूर्वी देवदेवस्कीच्या कारणावरुन देहेण कानसेवाडीने वाळीत टाकले होते. तुकाराम जगदाळे व शेजारच्या दोन मुलींचे भांडण झाले होते. त्यानंतर अचानकपणे ती मुलगी आजारी पडून तिचा मृत्यू झाला. परंतु तूच भुताटकी करुन तिला मारले, असा गावकऱ्यांचा समज झाला. यावरून हा वाद सुरु झाला. त्यानंतर गावात बैठक होऊन देवाला कौलसुद्धा लावण्यात आला होता. तेव्हापासून तुकाराम गावात देवदेवस्की करतो म्हणून त्याला वाळीत टाकण्यात आले होते.
गेली पाच वर्षे तुकाराम जगदाळे यांचे कुटुंब वाळीत आहे. तुकाराम जगदाळे यांनी अशाप्रकारच्या तक्रारीसुद्धा दिल्या आहेत. यावर दोन वर्षापूर्वी बैठकसुद्धा झाली होती. परंतु यावर कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर हा वाद पुन्हा पेटला. उपविभागीय पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांनी गुरुवारी सायंकाळी दोन्ही बाजूची बैठक बोलावली होती. मात्र त्यामध्ये तोडगा निघाला नाही.


देवस्कीचे कारण
वाळीत कुटुंबातील व्यक्तीचे प्रेत उचलण्यास अटकाव केल्याची व देवदेवस्कीच्या कारणावरुन वाळीत टाकल्याची तुकाराम जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे.
पालकमंत्री देहेणमध्ये
उद्या पालकमंत्री रवींद्र वायकर या प्रकरणी देहेण गावात येणार आहेत. पीडित कुटुंबाची ते विचारपूस करणार आहेत.


प्रकार उघडकीस
मंत्र्यांच्या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी चिन्मय पंडीत यांनी गुरुवारी देहेण गावात बैठक बोलावून पीडित कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीत देवदेवस्कीचा प्रकार उघड झाला.
चौकशीचे आदेश
मंत्रालय स्तरावरुन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याने प्रशासन ढवळून निघाले. या प्रकरणी आता गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी लवकरच कारवाई होईल, असे उपविभागीय अधिकारी पंडित यांनी गुरुवारी सांगितले.

Web Title: The meeting called by the police was in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.