स्वातंत्र्य दिनादिवशीच झाली हरवलेल्या आईची मुलाशी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:26 AM2019-08-16T11:26:22+5:302019-08-16T11:27:19+5:30
पाच महिन्यापूर्वी मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या आईची स्वातंत्र्य दिनीच रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठानने मुलाशी भेट घडवून आणली. आई आणि मुलाच्या भेटीने सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तराळले.
रत्नागिरी : पाच महिन्यापूर्वी मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या आईची स्वातंत्र्य दिनीचरत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठानने मुलाशी भेट घडवून आणली. आई आणि मुलाच्या भेटीने सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तराळले.
रतीबाई श्यामलाल साहू (६५) असे या वृद्धेचे नाव असून, त्या १२ मार्च २०१९ रोजी बेपत्ता झाल्या होत्या. मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील कुरवाई (ता. बरेरवाडी) हे त्यांचे गाव. वयानुसार त्यांना थोडे विस्मरण होत होते. १२ मार्च रोजी त्या नातेवाईकांकडे जाते असे सांगून घराबाहेर पडल्या होत्या.
शोधाशोध केल्यानंतरही त्या न मिळाल्याने मुलगा आसाराम याने पोलीस स्थानकात माहिती दिली. चुकीच्या बसमध्ये त्या बसल्या आणि अनोळखी ठिकाणी पोहचल्या. घराच्या ओढीने त्या मिळेल ती बस पकडत होत्या. मध्यप्रदेशमधून २७ दिवसानंतर त्या संगमेश्वरमध्ये पोहचल्या.
संगमेश्वर - देवरुख मार्गावर ८ एप्रिलच्या रात्री त्या चालत होत्या. याच दरम्यान बुरंबी येथील पराग नाईक दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी त्यांना ही वृद्धा दिसली. त्याचदरम्यान घरी जाणारे जे. डी. पराडकर हे त्याठिकाणी आले. दोघांनी रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानशी संपर्क साधला.
राजरत्नचे सचिन शिंदे आणि त्यांच्या कार्यर्त्यांनी त्यांना रत्नागिरीत पाठविण्यास सांगितले. जे. डी. पराडकर यांनी त्यांना घरातून जेवण आणून दिले, तर पराग नाईक यांनी १०८ रुग्णवाहिका बोलावून त्या वृद्धेला रत्नागिरीत पाठविले.
रत्नागिरीत आल्यानंतर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आंघोळ घालून मनोरुग्णालयात दाखल केले. मनोरुग्णालयात डॉ. अमित लवेकर आणि सोशलवर्कर डॉ. शिवदे त्यांच्यावर लक्ष ठेऊन होते. त्याचदरम्यान शिंदे यांनी मध्यप्रदेशच्या पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांशी बोलून खात्री करण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांना बोलावून १५ ऑगस्ट रोजी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.