पालिका अधिकाऱ्यांचाच सभात्याग
By admin | Published: May 3, 2016 10:14 PM2016-05-03T22:14:17+5:302016-05-04T01:06:47+5:30
चिपळूण पालिका सभा : टेबलावरील वही आपटण्याचाही प्रयत्न
चिपळूण : नगर परिषद हद्दीतील विविध तीन विषयांसाठी स्वीकृत नगरसेवक इनायत मुकादम यांच्यासह १२ नगरसेवकांनी विशेष सभेची मागणी केली होती. परंतु, ही विशेष सभा घेण्यात न आल्याने विरोधी नगरसेवकांनी आज (मंगळवारी) विविध ३५ विषयांसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत घोषणाबाजी केली. यावेळी सभेचा अजेंडा हिसकावून घेण्यात आला तर मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या समोरील टेबलावर असलेली वही आपटण्याचाही प्रयत्न झाला. विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सभागृहाबाहेर जाणे पसंत केले.
श्रावणशेठ दळी सभागृहात नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ४ वाजता विशेष सभा घेण्यात आली. या सभेपूर्वी विरोधी नगरसेवकांनी तीन विषयांसाठी विशेष सभेची मागणी केली होती. मात्र, ही मागणी जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याने याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु, त्यानंतरही जाणीवपूर्वक ही विशेष सभा घेण्याचे टाळण्यात आले. यामुळे विरोधी नगरसेवक आक्रमक झाले. ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी...’, ‘झालीच पाहिजे झालीच पाहिजे विशेष सभा झालीच पाहिजे...’, ‘टक्केवारीचा निषेध असो, सत्यवादीचा विजय असो’ अशा घोषणा विरोधी नगरसेवकांनी दिल्याने सभागृहात गदारोळ झाला. यामध्ये शिवसेनेचे गटनेते राजेश देवळेकर, शशिकांत मोदी, मिलिंद कापडी, इनायत मुकादम, लियाकत शाह, संजय रेडीज, समीर जाधव, सुरेखा खेराडे, माधुरी पोटे, पूजा गांगण, सायली काते, आदींचा समावेश होता. सभेला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचे गटनेते देवळेकर यांनी लिपीक सुहास चव्हाण यांच्या हातातील अजेंडा हिसकावून घेतला तर नगरसेवक मुकादम यांनी मुख्याधिकारी पाटील यांच्या टेबलावर असलेली वही उचलून आपटण्याचा प्रयत्न केला.
यानंतर पंधरा मिनिटांसाठी ही सभा तहकूब करण्यात येत आहे, असे नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी सांगितले. परंतु, मुख्याधिकारी पाटील हे सभागृहात आल्यानंतर विशेष सभेची मागणी करणाऱ्या विरोधी नगरसेवकांनी त्यांना पुन्हा घेराओ घातला व घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे सभागृहात पुन्हा प्रचंड गदारोळ सुरु झाला. या गदारोळातच राष्ट्रवादीचे गटनेते राजेश कदम यांनी १ ते ३५ विषयांचे वाचन केले. या दरम्यानही विरोधी नगरसेवकांची घोषणाबाजी सुरुच होती.
अखेर नगराध्यक्षा होमकळस यांना सभा आटोपती घ्यावी लागली. लिपीक चव्हाण यांच्या हातातून सभेचा अजेंडा हिसकावून घेण्यात आल्याबद्दल नगर परिषद कर्मचारी संघटनेने या कृत्याचा निषेध केला आहे. (वार्ताहर)
जाणीवपूर्वक दुर्लक्ष : नाईलाजाने सत्ताधाऱ्यांविरोधात बंड
शहरातील हॉटेल ग्रीनपार्क समोरील रस्त्याचे डांबरीकरण करणे, आरक्षण क्र. ५२ ला शहीद शशांक शिंदे यांचे नाव देणे, बाजारपूल ते फरशीपर्यंतच्या रस्त्याला डॉ. सरगुरोह यांचे नाव देणे, आदी तीन विषयांसाठी २९ मार्च रोजी विशेष सभेची मागणी विरोधी १२ नगरसेवकांनी केली होती. परंतु, १५ दिवसांत सभा घेणे बंधनकारक असताना राजकारण करुन ही विशेष सभा घेण्याचे टाळण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी लागली. जिल्हाधिकारी यांनी याचा अहवाल मागितला होता. याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव सत्ताधाऱ्यांविरोधात बंड पुकारावे लागले, असे नगरसेवक राजू देवळेकर, मिलिंद कापडी, शशिकांत मोदी, संजय रेडीज, इनायत मुकादम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अजेंडा हिसकावून घेतला.
मुख्याधिकारी यांच्या समोरील वही उचलून आपटण्याचा प्रयत्न.
नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी... घोषणांनी सभागृह दणाणले.
मुख्याधिकारी पंकज पाटील सभागृह सोडून बाहेर गेले.
नगरसेविका निर्मला चिंगळे यांनी केला मुख्य दरवाजा बंद.
प्रचंड गदारोळात सत्ताधाऱ्यांनी दिली विविध विषयांना मंजुरी.
विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी सभागृहाबाहेर जाणे केले पसंत.
ही बाब दुर्दैवी...
विरोधी नगरसेवकांनी विशेष सभेत जो गोंधळ घातला, हा प्रकार सभागृहाला अशोभनीय आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. चिपळूणचा विकास त्यांना नको आहे. कामे कशी थांबतील हा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु, जनता ओरड करणाऱ्यांना ओळखून आहे. विकास कामात खो घालणे योग्य नाही, असे राष्ट्रवादीचे गटनेते राजेश कदम यांनी सांगितले.