ओबीसाी संघर्ष समितीची रत्नागिरीत सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:34 AM2021-08-28T04:34:56+5:302021-08-28T04:34:56+5:30
रत्नागिरी : ओबीसी संघर्ष समिती तालुका रत्नागिरी या समितीच्या जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांना प्रारंभ झाला असून, पहिली सभा वाटद ...
रत्नागिरी : ओबीसी संघर्ष समिती तालुका रत्नागिरी या समितीच्या जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांना प्रारंभ झाला असून, पहिली सभा वाटद जिल्हा परिषद गटात घेण्यात आली. त्यानंतर दुसरी सभा शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह (सिव्हिल हाॅस्पिटलजवळ) येथे झाली. ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना इंग्रजांच्या कालखंडात झाली. यानंतर ती झाली नाही. मात्र, ही जनगणना २०२१ रोजी करण्याचे शासनाकडून जाहीर झाले होते; मात्र आजही याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, याबद्दल या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या सभेला संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते, मिलिंद कीर, महेश म्हाप,साक्षी रावणंग, राजीव कीर, दीपक राऊत, कुमार शेट्ये, प्रदीप घडशी, अनंत भडकमकर, शांताराम मालप, रूपेंद्र शिवलकर, अनिल पोटफोडे व्यासपीठावर उपस्थित होते. ३१ डिसेंबरपर्यंत ही जनगणना झाली नाही तर पुढे दहा वर्षे ओबीसी समाजाला वाट पाहावी लागेल. याला वाचा फोडण्यासाठी ओबीसी समाज संघटित होऊन संघर्ष करण्याची तयारी सुरू केली आहे असे प्रास्ताविकात रघुवीर शेलार यांनी सांगितले. शांताराम मालप यांनी ओबीसी समाजाला वेळोवेळी शासनाने सुविधांपासून डावलल्याने ओबीसी समाजाची दयनीय अवस्था झाली आहे. एकीच्या बळावर सर्वांनी लढा उभारूया असे सांगितले. संघर्षाशिवाय हक्क मिळत नाही. सर्वांनी संघर्ष समितीला बळ देण्याचे काम ओबीसी समाजाने करावे, असे आवाहन ॲड. विलास भोसले यांनी केले. भारतीय संविधान, सामान्यांचे हक्क आणि अधिकार, जातिनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण याविषयी बाळकृष्ण झोरे यांनी मार्गदर्शन केले. येणारा काळ ओबीसी समाजाचा असेल, असे मिलिंद कीर यांनी सांगितले.
देशामध्ये जाती निर्माण करणाऱ्यांच्या थोबाडीत मारावी, असा संताप व्यक्त करून ओबीसींना हक्क मिळत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार, असा निर्धार कुमार शेट्ये यांनी व्यक्त केला. ओबीसी समाजाची जनगणना व्हावी, आंदोलन करण्यात येईल, असे विधान संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते यांनी जाहीर केले.
या सभेत वार्डनुसार शहर कार्यकारिणी निवडण्यात आली. संघर्ष समितीचे सचिव सुधीर वासावे यांनी आभार मानले.
(फोटो मजकूर : ओबीसी संघर्ष समितीची सभा रत्नागिरीत आयोजित करण्यात आली होती. या सभेत ओबीसी समाजाचे नेते कुमार शेट्ये यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदकुमार मोहिते, मिलिंद कीर, महेश म्हाप, साक्षी रावणंग, राजीव कीर, दीपक राऊत, कुमार शेट्ये, प्रदीप घडशी, अनंत भडकमकर, शांताराम मालप, रूपेंद्र शिवलकर, अनिल पोटफोडे आदी उपस्थित होते.)