मच्छिमारांच्या समस्यांबाबत ५ एप्रिलला ‘सह्याद्री’वर बैठक, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 06:30 PM2023-03-21T18:30:51+5:302023-03-21T18:31:12+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील समस्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला.
राजापूर : राज्यातील चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील समस्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी मच्छिमारांच्या समस्यांचे निवारण होऊन न्याय देण्याची मागणी त्यांनी केली. मच्छिमारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सर्व आमदारांसमवेत ५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी एक वाजता सह्याद्री अतिथिगृह येथे बैठकीचे आयोजन केल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आमदार राजन साळवी यांनी सांगितले की, अनेक वादळे, कोविडमुळे कोकणातील मच्छिमारांची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमाऱ्यांनाही आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. तसेच किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत घेण्यात आलेली छोट्या मुदतीचे कर्ज व व्याज माफ करण्यात येणार का? तसेच कोकणातील नौकाधारक मच्छिमारांच्या डिझेल परतावा फेब्रुवारी २०२३ अखेर २७३.५१ कोटींचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १६१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला असून, उर्वरित १२२ कोटी रूपये डिझेल परतावा मिळणार का? तसेच डिझेल साठविण्यासाठी डिझेल डेपोची आवश्यकता असून, त्याप्रमाणे निर्मिती केली जाणार का? अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यामध्ये अनधिकृत बोटी मोठ्या प्रमाणत असून, त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे मान्य केले. तसेच नौकाधारक मच्छिमारांना मिळणारा डिझेल परतावा विशेष बाब म्हणून एप्रिलमध्येच सर्व डिझेल परतावा वितरित केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच डिझेल परतावा नियमित कसा केला जाईल याबाबत उपाययोजना केली जाईल, असे सांगितले. त्याचबराेबर किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या कर्जाबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले.