भाजप चिंतन बैठकीतून कार्यकर्त्यांचा सभात्याग
By admin | Published: March 8, 2017 11:21 PM2017-03-08T23:21:11+5:302017-03-08T23:21:11+5:30
गुहागरमध्ये बैठक; जिल्ह्याध्यक्षांशी वादावादीनंतर कृती
गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात चिंतन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत गुहागरमध्येही बुधवारी ‘भाजप’ची बैठक घेण्यात आली; परंतु जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी सुरू केलेल्या वादावादीमुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सभात्याग केल्याची घटना या बैठकीत घडली. जिल्हाध्यक्ष उपस्थित असतील, तर आम्ही सभेला बसणार नाही, असे ठणकावत सांगत उपस्थित कार्यकर्त्यांनी सभात्याग केल्याने सभाच निष्फळ ठरली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री दुर्गादेवी मंदिराशेजारील सभागृहात गुहागर तालुक्याचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्त्यांची दुपारी ३.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, जिल्हाध्यक्ष बाळ माने उशिरा आल्याने ही सभा सायंकाळी ५.१५ वाजता सुरू झाली. सभेला जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यासह शशिकांत चव्हाण, स्मिता जावकर, जिल्हा परिषद सदस्य स्मिता धामणसकर, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत बाईत, तालुकाध्यक्ष बावा भालेकर हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी बहुतांश उमेदवार व कार्यकर्ते असे ५० ते ६० जण यावेळी उपस्थित होते.
‘निवडणुकीत याने काम केले नाही, त्याने काम केले नाही’, अशी नेहमीच्या पठडीतील कारणमीमांसा न सांगता प्रत्येक उमेदवाराने पराभवाची कारणे सांगावीत,’ असे बाळ माने यांनी सुरुवातीलाच सांगितले. आपल्याच कार्यकर्त्याने विरोधात केलेले काम, उमेदवाराचे शिक्षण, उमेदवारी निश्चिती याबाबत उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी सांगावयास सुरुवात केली; परंतु या सर्वांवर समाधानकार उत्तरे देण्यात आली नाहीत. पहिल्यांदा उमेदवार कोण होत? हे आपल्याला माहीत नाही, असेच सांगितले. पडवे गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला कसा? त्याठिकाणी दुसरा उमेदवार का दिला नाही, अशी चर्चा सुरू केली.
या चर्चेदरम्यान तालुका खजिनदार रवींद्र कानिटकर यांना ‘तू कोण?’ अशी विचारणा जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केल्याने सारेच अवाक् झाले. कानिटकर यांनी ओळख करून देताना गुहागर शहरात आपल्याच उपस्थितीत झालेल्या मागील बैठकीचा दाखला दिला; परंतु माने त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नव्हते. शेवटी आमचे म्हणणे ऐकून न घेता उमेदवारांसह सर्वांना खाली बसावयास सांगत असाल तर मी निघतो, असे तालुका खजिनदाराने म्हटल्यावर त्यांना जाण्यास सांगितले. त्यामुळे उपस्थित सर्वच कार्यकर्ते संतप्त झाले. (प्रतिनिधी)