स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी समिती, उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:57 PM2020-01-11T13:57:11+5:302020-01-11T13:58:48+5:30
रत्नागिरी : कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीकरिता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक चर्चा झाली. कोकणसाठी स्वतंत्र ...
रत्नागिरी : कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीकरिता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक चर्चा झाली. कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सचिव पातळीवर समितीची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठअंतर्गत महाविद्यालयांच्या अवाढव्य वाढीमुळे प्रशासनावर ताण पडत आहे. स्थानिक गरजेप्रमाणे रोजगारक्षम अभ्यासक्रमासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ८३ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापण्याची गरज आहे, असे समितीचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी सांगितले.
उपकेंद्रामुळे कोकणचे शैक्षणिक प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन रमेश कीर यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत कोकण विद्यापीठाचा प्रश्न लवकर सुटण्याकरिता या बैठकीत आग्रह धरण्यात आला. स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या उभारणीसाठी जमीन व निधीची अडचण येणार नाही, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.
या महत्वपूर्ण बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृती समितीचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, सचिव सौरभ विजय, उपसचीव सतीश तिडके, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, डॉ. धनंजय माने, डॉ. संजय जगताप, रमेश कीर, सदानंद भागवत आदी मान्यवर हजर होते. सचिव विजय सौरभ यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ, मेरिटाईम, पर्यटन आदी खात्यांच्या प्रतिनिधींबरोबर अॅड. विलास पाटणे, रमेश कीर, सदानंद भागवत यांचा समावेश असलेली समिती नेमण्यात आली आहे.
७६४ महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत आहे. पर्यायाने १८५७ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. पेपरफुटी, उशिरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यात होणारा विलंब, अभ्यास मंडळ व प्राध्यापकांच्या नियुक्तीस होणारा विरोध याला विद्यापीठाचा वाढलेला पसारा कारणीभूत आहे.
मुंबई विद्यापीठाची स्वत:ची अशी परंपरा व प्रतिष्ठा होती. परंतु अलिकडे राजाबाई टॉवरला प्रचंड धक्के सहन करावे लागत आहेत. गोव्याच्या सीमेवरील दोडामार्ग महाविद्यालयातील विद्यार्थी - प्राध्यापकांना ५५० किलोमीटर अंतरावरील मुंबईतील विद्यापीठामध्ये कामाकरिता जाणे अवघड झाले आहे.
कोकण विद्यापीठातील अभ्यासक्रमाची निवड करताना कोकणी संस्कृतीचा प्राधान्याने विचार करता येईल. कोकणातील या दोन्ही जिल्ह्यात भौगोलिक सलगता तसेच शैक्षणिक प्रश्न समान आहेत. प्रवास, वेळ, खर्च वाचल्याने प्रशासनामध्ये अधिक कार्यक्षमता निर्माण होईल.
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राने अपेक्षा फोल ठरविल्या आहेत. उपकेंद्र सक्षम नाही. सिंधुस्वाध्यायसारखे अभ्यासक्रम बंद पडले, तर रेल्वेला लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे नवीन अभ्यासक्रम उपलब्ध झालेले नाहीत. उपकेंद्राला पूर्णवेळ समन्वयक नाहीत. तसेच अॅकेडिक सुपरवायझर उपलब्ध नाही. थोडक्यात उपकेंद्रात लोकसहभाग नाही.
कोकणामध्ये नव्याने स्थापन झालेल्या कोकण बोर्डातील दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी सलगपणे सात वर्षे महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकणातील विद्यार्थी, हुशार, प्रामाणिक, कष्टाळू असल्याने कोकण विद्यापीठदेखील स्वत:चे असे स्वतंत्र स्थान निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.
लोकमतकडून सातत्याने पाठपुरावा
कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. याबाबत लोकमतने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. कोकणची ही महत्त्वाची व रास्त मागणी लोकमतने वेळोवेळी बातम्यांद्वारे मांडली व शासनाचे लक्ष वेधले आहे. आता कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेकरिता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला असून, सचिव स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. लोकमतच्या लढ्याला यामुळे अधिक बळकटी मिळाली आहे.
१०३ महाविद्यालयांचा समावेश
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ४५, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ तसेच दक्षिण रायगडमधील २० मिळून १०३ महाविद्यालयांकरिता स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करणे ही काळाची गरज आहे. कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास कोकणातील स्थानिक गरजेप्रमाणे सुसंगत असे रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करता येतील. यामध्ये समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच मेरिटाईम व रेल्वे तंत्रज्ञानासंबंधी अनेक अभ्यासक्रम सुरु करता येणार आहेत. त्यामुळे हे विद्यापीठ होणे गरजेचे बनले आहे.