रत्नागिरी जिल्ह्यातील एलईडी मच्छीमारीबाबत लवकरच बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 05:33 PM2018-03-13T17:33:21+5:302018-03-13T17:33:21+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.
रत्नागिरी : जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.
रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात एलईडीद्वारे मासेमारी केली जात असल्याने पारंपरिक मच्छीमारांनी त्याबाबत कारवाईची मागणी केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर उपस्थित होते.
रामदास कदम यांनी सांगितले की, एलईडीद्वारे मासेमारी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मासे नष्ट होत आहेत. अशा मच्छीमारीवर बंदी आणली नाही तर भविष्यात मासे मिळणार नाहीत. आपल्याला केरळ आणि कर्नाटक राज्यावर अवलंबून राहावे लागेल. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटी पकडण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने त्यांना कोस्टल अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यावे, अशी सूचना महादेव जानकर यांनी अधिकाऱ्यांना केली. या बैठकीला आमदार अशोक पाटील, आमदार भारती लव्हेकर तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी दर्जासाठी प्रयत्न
मासेमारी करणाऱ्यांना शेतकऱ्यांसारखा कृषीचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. डिझेल परताव्याचे आतापर्यंत ४२ कोटी रुपये मच्छिमारांना दिले असून, आणखी २०० कोटी रुपयांची गरज आहे. त्यात ओखी वादळात नुकसान झालेल्या मच्छिमारांनाही मदत करायची असल्याचे सांगितले.