टक्केवारी मागण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:37+5:302021-03-31T04:32:37+5:30

चिपळूण : एरवी इतर कामांत नाटकी विरोध करून लोकांची दिशाभूल करणारे काही ठरावीक आणि मोजक्या नगरसेवकांनी मंगळवारी रिंग सेटलमेंट ...

Meetings of all party corporators to demand percentage | टक्केवारी मागण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठका

टक्केवारी मागण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठका

Next

चिपळूण : एरवी इतर कामांत नाटकी विरोध करून लोकांची दिशाभूल करणारे काही ठरावीक आणि मोजक्या नगरसेवकांनी मंगळवारी रिंग सेटलमेंट करण्यासाठी दोन-दोन बैठका केल्या. पैशासाठी नागरिकांना फसवणाऱ्या या नगरसेवकांची नावे लवकरच जाहीर करून त्यांचे पितळ उघडे पाडू, असा सणसणीत इशारा माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम यांनी दिला आहे.

मंगळवारी या ‘सेटलबाज’ नगरसेवकांची छोट्या व मोठ्या ठेकेदारांबरोबर बैठक झाली. या वेगवेगळ्या झालेल्या बैठकीत दोन्ही गटांकडून १५ टक्क्यांची मागणी करण्यात आली अशी आपली माहिती आहे, असा आरोप करून रमेश कदम यांनी पुढे सांगितले की, छोट्या ठेकेदारांनी यावर काहीच सांगितले नाही, तर मोठ्यांनी ही मागणी साफ धुडकावत फार तर पाच टक्के देऊ, असे स्पष्ट सांगितले. हा सर्व प्रकार हिणकस आहे. नगर परिषदेची टक्केवारी बाजारपेठ करायची व नागरिकांसमोर काही गोष्टींवर विरोधाचा दिखावा करायचा, अशी नाटके सुरू आहेत. पण, नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या सर्व नगरसेवकांचा दुहेरी चेहरा आपण लोकांसमोर आणणार आहोत. त्यांची नावे जाहीर करून पंचनामा करू, असा इशारा कदम यांनी दिला.

...............

नगर परिषद सभेत गदारोळ

माजी आमदार कदम यांनी केलेल्या आरोपांवरून नगर परिषद सभेत गदारोळ मजला. नगरसेवक निशिकांत भोजने यांनी याविषयी खुलासा होणे गरजेचे आहे, त्यांनी संबंधित नगरसेवकांची नावे जाहीर करावीत, अन्यथा कदम यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात यावी, अशी मागणी केली. यावर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी याविषयी दखल घेण्याची मुळीच गरज नाही. अशा आरोपांची काळजी करण्यापेक्षा विकासकामांवर भर द्या, असे आवाहन केले.

सुधीर शिंदेंनी घेतली जबाबदारी

माजी आमदार कदम यांनी केलेल्या आरोपांची काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या भर विशेष सभेत जबाबदारी घेतली. काही दिवसांपूर्वी काही ठेकेदार आपल्याकडे आले होते. त्यांनी नगर परिषदेकडे कामे होऊनही अनामतची १५ टक्के स्वरूपात लाखो रुपये अडकून असून, ठेकेदार मेटाकुटीस आले आहेत. हे ठेकेदार आपल्याकडे आल्यानेच कदम यांना पोटशूळ उठले असून, त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी ३० वर्षांत जे केले ते बाहेर काढायला वेळ लागणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

Web Title: Meetings of all party corporators to demand percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.