अधिकाऱ्यांच्या दांडीमुळे सदस्यांनी सभा गाजवली

By admin | Published: March 9, 2017 11:49 PM2017-03-09T23:49:00+5:302017-03-09T23:49:00+5:30

जिल्हा परिषद सभा : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर

Members held the meeting due to the sting of the officials | अधिकाऱ्यांच्या दांडीमुळे सदस्यांनी सभा गाजवली

अधिकाऱ्यांच्या दांडीमुळे सदस्यांनी सभा गाजवली

Next



रत्नागिरी : पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने आज (गुरुवारी) झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. सभेत सदस्यांमध्येही वादावादी झाल्याने आजची सभा गाजली. आमदारांवर केलेल्या टीकेमुळे जोरदार वादंग झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण न केल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली.
अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उपाध्यक्ष सतीश शेवडे, शिक्षण व वित्त सभापती विलास चाळके, महिला व बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, बांधकाम व आरोग्य सभापती देवयानी झापडेकर, सदस्य उदय बने, अजित नारकर, रचना महाडिक, अस्मिता केंद्रे, स्वरुपा साळवी, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामसभा पुरस्कारप्राप्त खेड तालुक्यातील पोयनार ग्रामपंचायतीला सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन अध्यक्ष गोलमडे व पदाधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आले. एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला. गेली पाच वर्षे मंडणगड तालुक्यातील बससेवेबाबतचा प्रश्न अजून सुटलेला नसल्याने सदस्या अस्मिता केंद्रे यांनी नाराजी व्यक्त केली. राजापूरचे गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही जोरदार चर्चा झाली. अनुपस्थित अधिकाऱ्यांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळेच अधिकाऱ्यांचा धीर चेपल्याने सभेला बिनदिक्कतपणे अनुपस्थित राहात आहेत. त्यांच्यावर ठोस कारवाई करण्याची मागणी सदस्य अजित नारकर, नंदकुमार मोहिते, बाबू म्हाप, बाळकृष्ण जाधव, अस्मिता केंद्रे यांनी केली. सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे, असा आदेश पालकमंत्री रवींद्र वायकर आणि जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी देऊनही ते सातत्याने गैरहजर राहात असल्याबद्दल संताप व्यक्त केला.
जिल्ह्यातील आमदार अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित का करीत नाहीत, असा प्रश्न नंदकुमार मोहिते यांनी उपस्थित केला. या सभेचा संबंध आमदारांशी जोडू नका, तुम्ही कधी आमदारांना याबाबत लेखी निवेदन दिलेत का, असा प्रश्न म्हाप यांनी मोहितेंना केला. मोहिते यांनी आमदारांवर केलेल्या टीकेबद्दल म्हाप, नारकर, बने हेही त्यांच्यावर आक्रमक झाले. बने यांनी मोहिते यांना आमदारांबद्दलचा शब्द मागे घेण्यास सांगितला. मात्र, मोहिते ठाम राहिले. अधिकारी उपस्थितीत राहात नसतील तर वेगवेगळे पर्याय आहेत, अशा शब्दात नारकर यांनी वर्षभर मिळत नसलेल्या न्यायाबद्दल सुनावले. यावेळी अस्मिता केंद्रेही आक्रमक झाल्या होत्या. (शहर वार्ताहर)

Web Title: Members held the meeting due to the sting of the officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.