घरकुल डेमाे हाऊसच्या उभारणीला सदस्यांचा विराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:31 AM2021-04-06T04:31:06+5:302021-04-06T04:31:06+5:30
राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या आवारात दोन गोदामांच्या इमारतीसह अन्य सात-आठ इमारतींच्या भाऊगर्दीमुळे केंद्र शासनाने मंजूर करण्यात आलेल्या घरकूल ...
राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या आवारात दोन गोदामांच्या इमारतीसह अन्य सात-आठ इमारतींच्या भाऊगर्दीमुळे केंद्र शासनाने मंजूर करण्यात आलेल्या घरकूल डेमो हाउसच्या उभारणीला पंचायत समितीच्या मासिक सभेत नकार देत, हा डेमो पंचायत समितीच्या आवारात उभारण्यात येऊ नये, असा ठराव करण्यात आला. हा डेमो हाउस शहरातील शासकीय जागेवर उभारण्याचा घाट यावेळी घालण्यात आला.
पंतप्रधान आवास घरकूल योजनेंतर्गत केंद्र शासनाने घरकूल डेमो हाउस तयार केला आहे. या डेमो हाउसनुसार या योजनेमधून मंजूर असलेले घरकूल उभारण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. हे डेमो हाउस उभारण्यासाठी राजापूर पंचायत समितीला मंजुरी देण्यात आली असून, याकरिता २ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यावर पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी पंचायत समितीच्या आवारातील असलेली जागा ही अद्यापही जिल्हा परिषदेच्या नावे नाही, तसेच या आवारात अद्ययावत अशी पंचायत समितीची इमारत उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. सध्या असलेल्या इमारती पंचायत समितीच्या आवारातील ९४ गुंठे असलेल्या जागेमध्ये येत आहेत. नुकतेच या जागेचा सर्वेक्षण करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसीलच्या गोडावूनसाठी ११० गुठ्यांपैकी १६ गुंठे जागा सोडण्यात येणार आहे. त्यामुळे डेमो हाउस उभारणीला मोठी अडचण होत आहे.
पंचायत समितीच्या आवारात घरकूल डेमो हाउस उभारल्यास हे नूतन इमारत उभारणीला अडचणीचे ठरू शकते. यामुळे या परिसरात डेमो हाउस उभारण्यात येऊ नये, असा सूर सर्वच सदस्यांमधून उमटला, तर तहसील कार्यालयामध्ये डेमो हाऊस उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. या ठिकाणीही जर जागा उपलब्ध न झाल्यास, तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय जागेत हा डेमो हाउस उभारण्यात यावा, असा ठराव करण्यात आला.