व्यापारी घरात, ग्राहक बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:19+5:302021-04-13T04:30:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शनिवार, रविवार या दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी सकाळीच बहुतांशी दुकाने सुरू झाली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शनिवार, रविवार या दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी सकाळीच बहुतांशी दुकाने सुरू झाली. त्यामुळे बाजारपेठा पुन्हा गजबजल्या. सकाळपासूनच सर्व रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू झाली. कपड्यांची दुकाने, हाॅटेल्स बंद होती. मात्र, नागरिकांचा मुक्त संचार सुरू होता.
सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जिल्हा प्रशासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्री ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ यावेळेत संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी वीकेंड लाॅकडाऊन जाहीर केला. या दोन्ही दिवशी असलेल्या लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून या लाॅकडाऊनला प्रतिसाद दिला.
नागरिकांनी या दोन दिवसात कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, यासाठी पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनीत चाैधरी यांच्या टीमने हा लाॅकडाऊन यशस्वी केला.
मात्र, सोमवारी सर्व दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. सकाळी सात वाजल्यानंतर रस्त्यावर वाहनांची गर्दी उसळली. त्यातच सध्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम सुरू असल्याने मारूती मंदिर ते माळनाका भागात वाहतुकीची कोंडी झाली. बॅंकाही दोन दिवस बंद होत्या. त्यामुळे सोमवारी सुरू होताच त्यासमोर ग्राहकांची मोठी रांग दिसत होती.
रत्नागिरी शहरातील राम आळी, धनजी नाका येथील काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच या भागातही काही दुकानांसमोर रस्त्यालगत खोदकाम सुरू असल्याने काही दुकाने सुरू ठेवता आली नाहीत. सकाळी सुरू झालेल्या काही दुकानांपैकी काही दुकाने सायंकाळी लवकर बंद झाली तर काही दुकाने रात्री आठ वाजता बंद करण्यात आली.
१५ एप्रिलपासून सर्वत्र कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे निदान दोन दिवस तरी आम्हाला दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे साकडे या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला घातले आहे. त्यामुळे मंगळवारीही काही दुकाने सुरू राहतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
चाैकट
सोमवारी बहुतांशी दुकाने उघडण्यात आली असली, तरी काही ठिकाणी मोठमोठी हाॅटेल्स, कापड विक्रेते तसेच अन्य दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. मात्र, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट, बार यांची घरपोच सेवा सुरू होती. शासकीय कार्यालयांमध्ये मात्र नागरिकांची संख्या तुरळक दिसत होती.