चिपळुणातील व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:52+5:302021-07-19T04:20:52+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेत त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेत त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर तपासणी बंधनकारक केले आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे तपासणी केलेली असेल, त्यांनाच दुकान उघडता येतील, असे आदेश जिल्हाधिकारी बी.एन. पाटील यांनी दिले आहेत.
सध्या चिपळूण बाजारपेठ सायंकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवली जाते. मात्र, सकाळच्या सत्रात बाजारपेठेत मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शनिवारपासून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीपीसीआर तपासणी सर्व व्यापाऱ्यांना सक्तीची केली आहे. त्याला व्यापाऱ्यांकडूनही तितकेच सहकार्य केले जात आहे.
२५ जुलैपासून नगर परिषद आणि पोलीस प्रशासन प्रत्येक दुकानात जाऊन मालक आणि कामगारांची तपासणी झाल्याची खात्री करणार आहेत, तसेच तपासणी अहवाल नसल्यास दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात येणार आहेत. व्यापाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने मेजर कलेकशन, स्वामी कॉम्प्लेक्ससमोर, जुना एस.टी. स्टँडशेजारी व गांधी चौक, जयंत साडी सेंटर बाजूला दोन तपासणी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. व्यापारी व कामगारांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिरीष काटकर, कार्याध्यक्ष किशोर रेडीज व सचिव उदय ओतारी यांनी केले आहे.