शहर विकास आघाडी सेनेत विलीन

By admin | Published: October 26, 2016 11:34 PM2016-10-26T23:34:02+5:302016-10-26T23:34:02+5:30

चिपळूणची समीकरणे बदलणार : भास्कर जाधव समर्थकांच्या पक्षांतराने राजकीय वर्तुळात खळबळ

Merging city development front | शहर विकास आघाडी सेनेत विलीन

शहर विकास आघाडी सेनेत विलीन

Next

 सुभाष कदम ल्ल चिपळूण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगर परिषदेवरील सत्ता घालविण्यासाठी आमदार भास्कर जाधव पुरस्कृत असलेल्या शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने चिपळूणच्या राजकारणाची समिकरणे बदलली आहेत. यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.
चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखालील आघाडीची सत्ता आहे. गेली अनेक वर्ष कदम गटाचे पालिकेवर वर्चस्व आहे. त्याला शह देण्याचा आतापर्यंत अनेकवेळा प्रयत्न झाला. २०११ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शहरातील निवडणुकीचे अधिकार माजी आमदार कदम यांना दिल्याने माजी मंत्री भास्कर जाधव यांनी त्यांच्या विरोधात आपले खंदे समर्थक मोहन मिरगल व आपले सुपुत्र समीर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडीचे उमेदवार उभे केले. यावेळी राष्ट्रवादीचे १२ उमेदवार निवडून आले तर शहर विकास आघाडीचे ५ उमेदवार निवडून आले. निवडणुकीनंतर हे दोघे एकत्र येतील अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली आणि शहर विकास आघाडी विरोधी पक्षात बसली. गटनेते मोहन मिरगल यांनी गेली ५ वर्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावली.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रभारी भास्कर जाधव असल्याने निवडणुकीची सुत्रे त्यांच्या हाती जातील अशी अपेक्षा होती. त्या दृष्टीने माजी आमदार कदम यांनी आपली तयारी सुरु केली होती. कदम हे पक्षातून काही काळ लांब होते. मध्यंतरी ते पक्षांतर करणार अशाही वावड्या उठल्या होत्या. परंतु,ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार कदम यांना निवडणुकीचे अधिकार देण्यात आले आणि ठिणगी पडली. प्रभारी असलेल्या आमदार जाधव यांना हे रुचले नाही.
आपल्या अधिकारात माजी आमदार कदम यांनी पार्लमेंटरी बोर्ड स्थापन केले व निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविले. शहर विकास आघाडीच्या म्हणजेच आमदार जाधव यांच्या एकाही समर्थकाने इच्छुक म्हणून अर्ज दिला नाही. परंतु, शहर विकास आघाडीचे पाच नगरसेवक असल्याने त्यांना पुरेसे स्थान द्यावे या अपेक्षेने माजी आमदार कदम गटाने काही जागा सोडण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी पार्लमेंटरी बोर्डाची बैठक मंगळवारी घेण्यात आली. परंतु, तरीही जाधव गटाकडून अर्ज आले नाहीत. म्हणून बुधवारी पार्लमेंटरी बोर्डाने पुन्हा बैठक घेतली. दरम्यान आमदार जाधव प्रणित शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली व शिवसेनेच्या चिन्हावर लढणे पसंत केल्याने त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यात जमा आहे. गटनेते मोहन मिरगल यांची उमेदवारी जाहीर झाली असून नगरसेविका सायली काते व पूजा गांगण यांच्यासह अन्य एका नवीन चेहऱ्याला दुसऱ्या यादीत स्थान दिले जाणार आहे. जाधव यांनी निर्माण केलेली आघाडीच शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे.
आज सकाळच्या सत्रात आमदार जाधव शिवसेनेत जाणार अशी जोरदार बातमी वाऱ्यासारखी पसरली. तत्पूर्वी गेले दोन महिने आमदार जाधव भाजपामध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. आता त्यांचे खंदे समर्थक शिवसेनेतून निवडणूक लढवित असल्याने आमदार जाधव पक्षांतर करणार का हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी आमदार जाधव नाराज असून त्यांची नाराजी दूर केली जाईल असे म्हटले आहे. त्यामुळे नाराज आमदार जाधव पक्षांतर करणार की राष्ट्रवादीत राहणार या विषयाची चर्चा सुरु झाली आहे.
आमदार भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक मोहन मिरगल यांनी शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत आज अचानक येऊन राष्ट्रवादीशी आपला संबंध नाही, असे सांगून खळबळ उडवून दिली. जाधव राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री व विद्यमान आमदार आहेत. त्यांचे समर्थक मिरगल यांनी केलेल्या या स्फोटक विधानामुळे आमदार जाधव यांची निश्चित भूमिका काय, याविषयी शहरात चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत आमदार जाधव भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा होती. असे असताना अचानक त्यांचे समर्थक शिवसेनेतून लढणार असल्याने नक्की पक्षांतर कसे होणार, याबाबतही तर्कविर्तक लढविले जात आहेत.
चिपळूण नगर परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत अनेकवेळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी गटाला पदच्च्युत करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. माजी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात माजी आमदार नानासाहेब जोशी व माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. शां. वि. बुरटे यांचीही शहर विकास आघाडी लढली. परंतु, त्यांनाही अपेक्षित यश मिळविता आले नव्हते. काळ बदलला आणि जोशी, बुरटे आणि माजी सभापती बाळसाहेब माटे यांच्या गटाने कदम यांच्याशी जुळवून घेतले. त्यानंतर २०११मध्ये आमदार भास्कर जाधव यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा कदम यांना काटशह देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोही फसला होता. आता आघाडी शिवसेनेत गेल्याने आघाडीचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. पुन्हा एकदा सर्व पक्ष विरुध्द राष्ट्रवादीचे कदम अशी रंगतदार लढाई होणार आहे.
 

Web Title: Merging city development front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.