म्हाप्रळ - आंबेत पुलावरून १० जूनपर्यंत वाहतूक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:23 AM2021-05-28T04:23:56+5:302021-05-28T04:23:56+5:30
मंडणगड : गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी म्हाप्रळ - आंबेत पुलाच्या रखडलेल्या कामाला जानेवारी महिन्यात गती मिळाली़. सार्वजनिक बांधकाम ...
मंडणगड : गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी म्हाप्रळ - आंबेत पुलाच्या रखडलेल्या कामाला जानेवारी महिन्यात गती मिळाली़. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच महिन्यांच्या कालावधीत पुलाचे काम पूर्णत्वाकडे आणले असून, १० जून २०२१ पूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
महाड येथील सावित्री नदी पुलावरील दुर्घटनेनंतर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील खाडी पुलांवरील स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी सर्वच स्तरातून सातत्याने पुढे आली हाेती़. त्यानंतर तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलाच्या मजबुतीकरणासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र, ग्रामस्थांनी म्हाप्रळ - आंबेत पंचक्रोशीतील गावांसाठी पर्यायी वाहतुकीची मागणी केल्याने डिसेंबर महिन्यात ७० लाखांचा निधी खर्च करुन प्रथम जेटीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर म्हाप्रळ - आंबेत दरम्यान रो-रो सेवा सुरु करण्यात आली.
सद्यस्थितीत या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, प्रिस्टल बेअरिंग गार्ड बनवणे, पुलाचे पिलर व गर्डर सुधारणे व मजुबतीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे तसेच पुलावरुन खोदलेल्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. पुलाचे रंगकामही सुरु आहे. यासाठी दोन योजनांच्या माध्यमातून ९ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा ३७६ मीटर लांबीचा हा पूल जीर्ण झाल्याने व पुलाच्या खांबाचे परिसरात नदीपात्र रुंदावल्याने पूल नादुरुस्त झाला होता. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही हा पूल धोकादायक झाल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला होता. सहा महिन्यांपूर्वी पुलावरील अवजड वाहतूक दुसऱ्यांदा बंद झाली होती़.
मंडणगड तहसील कार्यालयाने पुलाच्या १०० मीटरवरील व खालील बाजूला रेती उत्खनन करण्यास पूर्णपणे मज्जाव केला होता. या विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, महाडचे कार्यकारी अभियंता बामणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हेडखाली पुलाचे मजबुतीकरणासाठी प्राप्त झालेला ९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. बांधकाम विभाग कामाचे नियंत्रण करत असून, १० जून २०२१पर्यंत उर्वरित कामे पूर्ण करुन पूल वाहतुकीकरिता खुला करुन देण्याचे प्रयत्न राहणार आहेत.
----------------------------------
दाेनवेळा स्ट्रक्चरल ऑडिट
तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहेमान अंतुले यांच्या कालखंडात १९८२मध्ये म्हाप्रळ - आंबेत पुलाची उभारणी करण्यात आली. हा पूल रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरला. दि. १८ जुलै २०१९ रोजी पुलाच्या केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार आंबेत पुलाच्या पिलर कॅप ब्रॅकेटचे स्टील पूर्णतः गंजलेले असून, ब्रॅकेट उघडे पडले आहेत. तसेच बेअरिंग पेडस्टलला भेगा पडल्याचे निदर्शनास आले होते. तर २८ सप्टेंबर २०१९ रोजी पुलाच्या म्हाप्रळ बाजूकडील दोन पिलरच्या ब्रॅकेटची पाहणी केली असता, ब्रॅकेटचे स्टील पूर्णतः गंजल्याचे आढळले. तसेच ब्रॅकेटचे काँक्रिटही मोठ्या प्रमाणात निखळल्याचे आढळले हाेते.
-------------------
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ - आंबेत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.