पोषण आहारात मिळणार परसबागेतील ‘मायक्रोग्रीन’ भाजी
By शोभना कांबळे | Published: July 18, 2023 01:32 PM2023-07-18T13:32:07+5:302023-07-18T13:32:35+5:30
‘मायक्रोग्रीन’ भाज्या कोणत्या?
शोभना कांबळे
रत्नागिरी : विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी, त्यांना पोषक आहार मिळावा, या उद्देशाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा तयार केल्या जात आहेत. या परसबागांमधून पौष्टिक अल्पकालीन सूक्ष्म भाजीपाल्याची (मायक्रोग्रीन) लागवड करावी व या पौष्टिक पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा, असा आदेश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी (दि.११ जुलै २०२३) काढला आहे.
केंद्र सरकारने परसबाग संदर्भातील निर्देश दि. १५ ऑक्टोबर २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले होते. त्याअनुषंगाने राज्यात काही शाळांमध्ये परसबाग उपक्रम राबविला जात असून, विद्यार्थ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे आदींचा समावेश पोषण आहारात केला जात आहे. मात्र, काही शाळांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे हा उपक्रम राबविला जात नाही. सर्वच शाळांमध्ये कमी जागेतही विविध पर्यायांद्वारे अल्पकालीन सूक्ष्म भाजीपाला लागवड हा उत्तम पर्याय ठरणार आहे. उपलब्ध जागा विचारात घेऊन परसबागांची निर्मिती करताना स्थानिक पातळीवरील अल्पकालीन सूक्ष्म (मायक्रोग्रीन) भाजीपाल्याची सेंद्रिय पद्धतीने लागवड करावी. यासाठी विद्यार्थ्यांचा वयोगट विचारात घ्यावा.
विद्यार्थ्यांना कंपोस्ट, गांडूळ अशी पर्यावरणपूरक खते तयार करण्यास शिकवावे, अशी सूचना केली आहे. या उपक्रमाकरिता शाळांनी नजीकचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी शाळा, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था (NGO), सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य घ्यावे, असेही शासन निर्णयात म्हटले आहे.
रत्नागिरी आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रमोद जाधव यांनी शिक्षण खात्याचे प्रधान सचिव रणजित सिंह देवोल यांची भेट घेऊन शालेय परसबाग उपक्रमामध्ये कमी जागेचा आणि कमी वेळेचा पौष्टिक व अल्पकालीन सूक्ष्म भाजीपाला (मायक्रोग्रीन ) लागवडीचा समावेश करण्याबाबत सूचना केली. या भाज्यांच्या लागवडीविषयी माहितीही दिली. देवोल यांनी हा शासन निर्णय काढण्यासाठी महत्त्वाचा पुढाकार घेतला.
अनेक शाळांमध्ये परसबागेसाठी जागा कमी असते. परंतु, उपलब्ध जागेचा वापर करून शाळांनी अल्पकालीन सूक्ष्म भाजीपाल्याची (मायक्रोग्रीन) लागवड करून पोषण आहारात समावेश केल्यास मुलांना पाैष्टिक भाज्या मिळतील. - प्रमोद जाधव, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग
‘ मायक्रोग्रीन ’ भाज्या कोणत्या?
मेथी, वाल, हरभरा, मूग, बीट, मका, मुळा, मोहरी, सूर्यफूल, कांदा, वाटाणा, चवळी, पालक, राजमा, गहू (गव्हांकूर).