जबरदस्तीने मिऱ्या येथे एमआयडीसी लादणार नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 06:17 PM2024-08-26T18:17:42+5:302024-08-26T18:18:33+5:30
लाेकांना माझ्याविराेधात कितीही भडकवा; पण..
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये उद्योग आणावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. येथील जनतेला रोजगार मिळावा, युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी तुमचा पालकमंत्री प्रयत्न करत आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प आणण्याचे काम केले, जिथे एमआयडीसीची अधिसूचना निघाली आणि तिकडे विरोध झाला. पण स्थानिकांना रोजगार नको, प्रकल्प नको तर कोणावरही जबरदस्ती करून एमआयडीसी लादली जाणार नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.
टाटा टेक्नाॅलाॅजीस व महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे काैशल्यवर्धन केंद्राच्या उभारणीचे भूमिपूजन उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील एमआयडीसी उभारणीवरून सुरू झालेल्या विराेधावर भाष्य केले. भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी एमआयडीसीला विराेध केला असून, अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे. हाच मुद्दा धरून मंत्री सामंत यांनी जाेर जबरदस्ती करून एमआयडीसी लादणार नसल्याचे स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, मिऱ्यावासीयांच्या भावना भडकवून राजकारण केले जात आहे. माझ्यावर आरोप केले जात आहेत. मात्र आज सांगतो, माझ्या २० वर्षांच्या कार्यकाळात कोणत्याच समाजावर, गावावर अन्याय किंवा जबरदस्ती करून कोणतेच काम केले नाही. सगळ्यांना बरोबर नेऊन काम करण्याचे प्रामाणिक काम उद्योगमंत्री म्हणून मी केले आहे. मात्र, नाहक माझी बदनामी करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. लाेकांना माझ्याविराेधात कितीही भडकवा; पण जोपर्यंत रत्नागिरीतील जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मी कोणालाही घाबरत नाही, असे मंत्री सामंत यांनी ठणकावून सांगितले.