मध्यरात्री हाहा:कार
By admin | Published: March 11, 2015 11:33 PM2015-03-11T23:33:23+5:302015-03-12T00:05:32+5:30
फुणगूस परिसर : वादळी वाऱ्यांमुळे ग्रामस्थांनी रात्र काढली जागून
फुणगूस : संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री भयंकर अशा वादळासह अवकाळी पावसाने अक्षरश: हैदोस घातला. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की मोठमोठी झाडे अक्षरश: उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले, तारा तुटल्या, तसेच अनेक घरांना वादळाचा तडाखा बसला. घराचे छप्पर उडाले, भिंती पडल्या, कौले उडाली. त्यामुळे मध्यरात्री एकच हाहाकार उडाला. वादळाच्या तडाख्यामुळे फुणगूस-डिंगणी खाडी भाग गेले अठरा तास अंधारात पडला आहे.
मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप सुरुवात झाली. परंतु, खऱ्या अर्थाने अवकाळीची वक्रदृष्टी संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीभागावर पडली आणि पावसासह वाऱ्याने देखील येथे नुकसानीला सुरूवात केली. हळुहळू पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढत गेला. जोडीलाच विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरु झाला. तेव्हा वादळाचे स्पष्ट संकेत दिसू लागले.रात्री १० च्या सुमारास वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. दुसऱ्या बाजूला पावसाचा जोरही वाढला आणि भयंकर असे वादळ परिसरात घोंघावू लागले. वादळाचा वेग क्षणाक्षणाला वाढू लागला आणि लोकांची भीतीने गाळण उडाली. तोपर्यंत वीजपुरवठा खंडित झालेला होता. वादळी वाऱ्याची तीव्रता इतकी भयंकर होती की विजेचे खांब जमिनीतून उन्मळून पडले. अनेक ठिकाणी लहान मोठी झाडे तुटून पडली. वादळाने जणू थैमान मांडले होते. निसर्गाच्या या रौद्ररुपाने ग्रामस्थ भयग्रस्त झाले होते.
वीजेचे खांब, तारा, झाडे यांना दणका दिल्यानंतर वादळाने थेट घरांना लक्ष केले. अनेक घरांची कौले उडून गेली, पत्रे वाऱ्याच्या झोताबरोबर उखडून गेले. पुढे वादळाने अधिकच उग्ररूप धारण केले. अनेक घरांच्या पडव्या पडल्या, भिंती जमीनदोस्त झाल्या. डोळ्यांदेखत राहती घरे कोसळत असताना कोणीच काही करु शकत नव्हते. अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. वादळाच्या दणक्याने फुणगूस मोहल्ला येथील कादर हसन खान यांच्या पिठाच्या गिरणीचे छप्पर पूर्णपणे उडून गेले. चिऱ्याच्या भिंती कोसळल्या. त्यांच्याच घराच्या पडवीचेही छप्पर उडून गेले. हनिफ बोदले यांच्या घराची पडवी वादळाने जमीनदोस्त केली. अनेकांच्या घरावर झाडांच्या फांद्या पडून मोठे नुकसान झाले. नुकसानीचा निश्चित आकडा अद्याप उपलब्ध झालेला नाही. वादळाने संपूर्ण खाडीपट्ट्यात थैमान घातले होते. डिंगणी, कुरधुंडा, कोंड्ये, मेढे, मांजरे अशा अनेक गावांना वादळाचा प्रचंड मोठा तडाखा बसला आहे. आंबा तसेच काजू बागांची दाणादाण उडाली. आंबाफळे गळून पडल्याने बागायतदारांचे नुकसान झाले आहे. या वादळाने गतकाळातील फयान वादळाच्या स्मृती जाग्या केल्या. (वार्ताहर)