गाेळप येथील दाेन कुटुंबीयांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:21 AM2021-07-19T04:21:04+5:302021-07-19T04:21:04+5:30
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप मानेवाडी येथील मोहिते कुटुंबीयांच्या घराजवळील जमीन मुसळधार पावसामुळे खचल्याने दोन घरांना धोका निर्माण झाला ...
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप मानेवाडी येथील मोहिते कुटुंबीयांच्या घराजवळील जमीन मुसळधार पावसामुळे खचल्याने दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. या घरांना धाेका निर्माण झाल्याने त्यांना स्थलांतराची सूचना करण्यात आली हाेती. त्यानुसार दाेन्ही कुटुंबांनी स्थलांतर केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणची जमीन दहा ते पंधरा फुटाने खचल्याने एका घरातील तीन कुटुंबांना याचा धोका निर्माण झाला आहे. घराशेजारील साधारण सात ते आठ गुंठे जागा झाडामाडांसह खचली आहे. पावसात घराजवळील पाच फूट जागा पुन्हा खचल्याने दोन घरांचा धोका अधिक वाढला आहे. सध्या या दोन घरातील कुटुंबीयांनी जवळच असलेल्या साई मंदिराचा आसरा घेतला आहे. तेथे झोपड्या तयार करून ही कुटुंब राहात आहेत. पावसाचा जाेर कायम राहिल्यास ही घरे जमीनदाेस्त हाेण्याचा धाेका वाढला आहे.