स्थलांतरणाची नोटीस जारी
By Admin | Published: August 27, 2014 10:23 PM2014-08-27T22:23:06+5:302014-08-27T23:26:28+5:30
वडदहसोळमध्ये भीती : ५१ कुटुंबांना दक्षतेचा आदेश
राजापूर : पुण्यातील माळीण दुर्घटनेनंतर सावध झालेल्या महसूल प्रशासनाने वडदहसोळ गावातील ५१ कुटुंबीयांना तातडीने स्थलांतराची नोटीस बजावली आहे.
यापूर्वी २००९ साली झालेल्या लगतच्या डोंगराचा मोठा भाग तुटून खाली असलेल्या घरावर कोसळून म्हादये कुटुंबातील आठजण जागीच गाडले गेले होते, तर शिवणे बुद्रुक गावाकडे जाणारा रस्ता पूर्ण खचल्याने गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मागील सहा-सात वर्षांत अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाबाबत शासनाने कोणतेच धोरण राबवलेले नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊनच राहावे लागत आहे.
दरम्यान, पुण्यातील माळीण येथील जीवघेण्या घटनेनंतर हादरलेल्या प्रशासनाने तालुक्यातील धोकादायक परिसराची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी केली. त्याचा अहवाल १ आॅगस्ट २०१४ला राजापूर तहसीलदारांना सादर करण्यात आला. त्यानुसार तहसीलदारांनी वडदहसोळ गावातील म्हादयेवाडीतील १२, हळदीची खादवाडीतील ३५ आणि हसोळ गोपाळवाडीतील ४ अशा ५१ कुटुंबीयांना तत्काळ स्थलांतराची नोटीस बजावण्यात आली. मात्र, या कुटुंबीयांनी नक्की कुठे जायचे. याबाबत त्या नोटीसमध्ये काहीच नमूद नाही. पर्यायी व्यवस्थादेखील केलेली नाही. त्यामुळे धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांपुढे अडचणी वाढल्या आहेत.
शासनाच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. केवळ नोटीस बजावून शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. पर्यायी जागा वेळेवर उपलब्ध करुन देण्याकामी शासन आपले कर्तव्य पार पाडणार नसेल तर त्या केवळ नोटिसीला अर्थ काय, सवाल ग्रामस्थांतून उपस्थित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)