राजापूर परिसरात स्थलांतरीत करकाेचा पक्ष्याचे दर्शन, तीन वर्षानंतर झालं पुन्हा आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 02:11 PM2022-02-05T14:11:42+5:302022-02-05T14:12:06+5:30
हा पक्षी गिधाडासारखा काहीसा दिसणारा असून, थव्याने राहण्याऐवजी एकटाच राहण्याला त्याची पसंती असते
राजापूर : केवळ पांढरी मान आणि शरीराचा अन्य भाग काळा अशी रंगछटा असलेला करकोचा-कांडेसर (कामऱ्या ढोक) या स्थलांतरीत पक्ष्यांचे सुमारे तीन वर्षानंतर राजापूर परिसरात पुन्हा एकदा आगमन झाले आहे. गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये अर्जुना नदीच्या काठावर आणि आडिवरे परिसरामध्ये त्याचे वास्तव आहे.
सीगल पक्ष्यांसह अन्य स्थलांतरीत पक्ष्यांचे तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर दरवर्षी आगमन होते. त्याप्रमाणे करकोचा-कांडेसर या पक्ष्याचेही तालुक्यामध्ये आगमन होत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. मात्र, मध्यंतरी काही वर्ष करकोचा-कांडेसर या पक्ष्याचे थंडीच्या कालावधीमध्ये तालुका परिसरामध्ये वास्तव्य आढळले नव्हते.
गेल्या काही दिवसांपासून करकोचा पक्ष्यांच्या वास्तव्याने पक्षीप्रेमी सुखावले आहेत. काही वर्षापूर्वी वनविभागातर्फे पाणपक्ष्यांचे सर्व्हेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये विविध प्रकारच्या सतरा प्रजातींचे सुमारे दोनशेहून अधिक पक्षी आढळले होते. त्यामध्ये करकोचा-कांडेसर या पक्ष्याचाही समावेश होता.
दुर्मीळ प्रजातींच्या पक्ष्यांचे तालुक्यात वास्तव असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. त्याच्यातून येथील निसर्ग पक्ष्यांच्या वास्तव्याला अनुकूल असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.
एकटाच राहण्याला पसंती
केवळ पांढरी मान आणि बाकी सर्व शरीर काळेकुळकुळीत अशी विचित्र मात्र, आकर्षक शरीराची रंगसंगती असलेला हा पक्षी गिधाडासारखा काहीसा दिसणारा असून, पाणथळी भागामध्ये बहुतांशवेळा वास्तव्याला आढळतो. थव्याने राहण्याऐवजी एकटाच राहण्याला त्याची पसंती असते.
मध्यंतरी हा पक्षी का गायब होता ? याचे निश्चित कारण स्पष्ट होत नाही. मात्र, त्यावेळची पर्यावरणीय स्थिती त्याच्या वास्तव्याला अनुकूल नसावी. त्यामुळेच ताे या भागात आलेला नसावा. यावेळी पर्यावरणीय स्थिती अनुकूल असल्याने त्याचे आगमन आणि वास्तव्य आहे. त्याचे झालेले आगमन आणि वास्तव्य सुखद आहे. - धनंजय मराठे, पक्षीमित्र