चिपळुणात सार्वजनिक शौचालयांसाठी लाखोंची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:52+5:302021-07-04T04:21:52+5:30

चिपळूण : शहरात सार्वजनिक शौचालये बांधण्यासाठी येथील नगर परिषदेने तब्बल ७३ लाख रुपये इतका खर्च केल्याचे आता समोर आले ...

Millions fly to public toilets in Chiplun | चिपळुणात सार्वजनिक शौचालयांसाठी लाखोंची उड्डाणे

चिपळुणात सार्वजनिक शौचालयांसाठी लाखोंची उड्डाणे

Next

चिपळूण : शहरात सार्वजनिक शौचालये बांधण्यासाठी येथील नगर परिषदेने तब्बल ७३ लाख रुपये इतका खर्च केल्याचे आता समोर आले आहे. त्यापैकी एका प्रभागात तर चक्क २८ लाख रुपयांचे एक शौचालये बांधण्यात आले आहे. सार्वजनिक शौचालयांसाठी नगर परिषदेची लाखोंची उड्डाणे पाहता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु, या कामाबाबत तक्रारी झाल्याने बिले मात्र अद्याप अडकून पडली आहेत. त्यामुळे ठेकेदारांनीदेखील डोक्याला हात लावला आहे.

शासनाने हागणदारीमुक्त परिसर, घर तिथे शौचालय आणि सार्वजनिक शौचालय असे परिपत्रक काढताच चिपळूणमध्ये जणू सार्वजनिक शौचालय बांधणीचा नवीन फंडा सुरु झाला. नगरसेवकांनी पत्रामागून पत्रे नगर परिषदेला दिली. इतकेच नव्हे तर या कामासाठी इतकी घाई केली की, थेट ५८/२ नियमाखाली शौचालयांसाठी निधी खर्च करण्याचा थेट ठराव सभागृहात करून नगरसेवक मोकळे झाले. नगरसेवकांची मागणी आणि ठराव पाहता नगराध्यक्षा आणि प्रशासनानेही त्याला मान्यता दिली. नगरसेवकांनी अभियंत्यांना बरोबर घेऊन शौचालयाचे अंदाजपत्रक तयार करण्याचा सपाटा सुरू केला. शहरात १० लाखांपासून ते चक्क २८ लाखांपर्यंत सार्वजनिक शौचालयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. असे एकूण ७३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून कामेही सुरू करण्यात आली. त्यापैकी काही ठिकाणी जुने पाडून नवीन शौचालय बांधण्याचा हट्ट करण्यात आला.

सुमारे २८ लाखांचे एक शौचालय हा चिपळुणात मोठा चर्चेचा विषय बनला. एक मोठे घर किंवा बंगला २८ लाखांत सहज होऊ शकते. मग २८ लाखांचे शौचालय कोणत्या पद्धतीचे आणि कसे असणार? कोणती अत्याधुनिक पद्धत वापरण्यात येणार आहे? अद्ययावत पद्धतीचे ते शौचालय असणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Millions fly to public toilets in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.