विड्याच्या पानांनी रंगतो लाखो रूपयांचा बाजार-- ग्रामीण भागात आजही आदराचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:22 AM2018-10-01T11:22:46+5:302018-10-01T11:35:22+5:30

बारशापासून बाराव्यापर्यंत प्रत्येक धार्मिक कार्यात, राजांच्या दरबारात, इतकेच नाही तर शृंगारातही मानाचे स्थान असलेले खाण्याचे पान, अर्थातच विडा. काहीवेळा टीकेचा धनी होणाऱ्या या विड्याच्या पानाला पुन्हा एकदा वलय येऊ लागले आहे

Millions of rupees market painted by the leaves of the bride - a symbol of respect even today in rural areas | विड्याच्या पानांनी रंगतो लाखो रूपयांचा बाजार-- ग्रामीण भागात आजही आदराचे प्रतीक

विड्याच्या पानांनी रंगतो लाखो रूपयांचा बाजार-- ग्रामीण भागात आजही आदराचे प्रतीक

googlenewsNext
ठळक मुद्देपानाला परत प्रतिष्ठा -विवाह समारंभांच्या बदलत्या पद्धतींमुळे व्यवसायात ३0 टक्के घटबाजारातील उलाढालीवर सकारात्मक परिणाम होणे अपेक्षित आहे‘विडा घ्या हो नारायणा’, अशा आरत्यांपासून ‘राजसा घ्यावा गोविंद विडा’ यासारख्या लावण्यांपर्यंत विड्याची जागा मानाची आहे.

 

-मनोज मुळये -

रत्नागिरी : बारशापासून बाराव्यापर्यंत प्रत्येक धार्मिक कार्यात, राजांच्या दरबारात, इतकेच नाही तर शृंगारातही मानाचे स्थान असलेले खाण्याचे पान, अर्थातच विडा. काहीवेळा टीकेचा धनी होणाऱ्या या विड्याच्या पानाला पुन्हा एकदा वलय येऊ लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विड्याच्या पानावर दररोज काही लाखांची उलाढाल होत आहे.

‘विडा घ्या हो नारायणा’, अशा आरत्यांपासून ‘राजसा घ्यावा गोविंद विडा’ यासारख्या लावण्यांपर्यंत विड्याची जागा मानाची आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात सर्वप्रथम विड्याची पूजा होते. अनादि काळापासून विड्याचे हे महत्त्व कायम आहे. विड्याचे पान आरोग्यासाठी उपयुक्त आहे आणि ते आरोग्यास हानीकारक आहे, असे दोन्ही मतप्रवाह कायम आहेत. पण हे दोन्ही प्रवाह असतानाही विड्याचे महत्त्व कायम आहे. सुपारीच्या वाढत्या दरामुळे गेल्या दहा वर्षात हा व्यवसाय ३० टक्के कमी झाला आहे. मात्र, त्यानंतरही दररोजच्या पानाच्या खरेदी-विक्रीतून लाखो रूपयांची उलाढाल होत आहे.

हे आहेत जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या  पानांचे प्रकार

विड्याच्या पानांचे वेल असतात. या वेलीची पाने खुडून बाजारात विक्रीसाठी आणली जातात. साधी पाने तीन प्रकारची असतात. मोठ्या आकाराच्या पानाला ‘मुंबई पान’ किंवा ‘स्पेशल कच्ची कळी’ म्हणतात. मध्यम आकाराच्या पानाला ‘कच्ची कळी’ म्हणतात तर लहान आकाराच्या पानाला ‘हक्कल’ म्हणतात. त्याखेरीज कलकत्ता, बनारस आणि मघई अशा तीन प्रकारची पाने आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होतात. मसाला पानाला (बोली भाषेत गोड पानाला) मुंबई पान म्हणजेच स्पेशल कच्ची कळी या प्रकारचे पान वापरले जाते. त्यामुळे त्याचा खप जास्त आहे.

 

 

गेल्या दहा वर्षात सुपारीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे पानांची विक्री साधारणपणे ३० टक्क्यांनी घटली आहे. त्यातच नवीन पिढी पानाऐवजी गुटख्याकडे वळली आहे. त्याचाही पानाच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. मंगल कार्यातील पानांचा वापर कायम असला तरी पाहुण्यांच्या स्वागताला दिल्या जाणाऱ्या पानांच्या वापरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

- शशिकांत मगदुम, पान व्यापारी, रत्नागिरी

 

पान म्हणजे फक्त व्यसनच नाही. त्यात असंख्य प्रकार आहेत, जे लोकांना आवडतात आणि हानीकारक नसतात. आम्ही पानमंदिर सुरू करताना पानांच्या वैविध्यपूर्ण प्रकारांवरच लक्ष दिले आहे. सर्वसाधारणपणे महिला पानपट्टीवर जात नाहीत. म्हणूनच आम्ही पान मंदिर उभे केले आहे. असंख्य महिलांनी हीच प्रतिक्रिया माझ्याकडे भेटून व्यक्त केली आहे. आता महिला एकट्यानेच येतात आणि पान खाऊन जातात. त्यांना कोणाची सोबत लागत नाही.

- मुग्धा गोगटे, रूची पान मंदिर, रत्नागिरी.

 

पानपट्टी अन् पानवाला.. छे... पान मंदिर अन् पानवाली

पानपट्टीवर जाणे, तिथे उभे राहणे, पान खाणे हे फारसे प्रतिष्ठेचे मानले जात नाही. त्यामुळे महिला पानपट्टीवर जाताना किंवा थांबताना दिसत नाहीत. पण मसाला पानाची आवड महिलांमध्येही असते. कोणी आणून देणारे असेल तरच महिलांना पान खायला मिळते. रत्नागिरीतील महिलांना मात्र आता त्यावर चांगला पर्याय मिळाला आहे. रत्नागिरीतील मुग्धा गोगटे, अजित गोगटे आणि वैभव करवडे यांनी रूची पान मंदिर सुरू केले आहे. इथे तंबाखूविरहित पानांचे सध्या ४० प्रकार मिळतात. अगदी सर्वात पहिल्या गोविंद विड्यापासून केकच्या स्वादातील पानही येथे मिळते. कंठसुधारक पान, त्रयोदशीगुण विडा अशी शरीराला उपयुक्त घटकांची पानेही येथे मिळतात. पानवालाऐवजी पानवाली हा सद्यस्थितीत रत्नागिरीकरांसाठी कुतुहलाचा आणि कौतुकाचाही विषय आहे. वेगळी वाट म्हणून निवडलेल्या या क्षेत्रात आपले करियर ‘रंगवण्याचा’ मुग्धा गोगटे यांचा प्रयत्न अनेकांसाठी आदराचाही आहे. एका महिलेने ‘पान लावायला’ घेतल्यामुळे आता महिलांनी पान खायला जाणेही अप्रतिष्ठेचे राहणार नाही. साहजिकच त्याचा बाजारातील उलाढालीवर सकारात्मक परिणाम होणे अपेक्षित आहे.

 

अशी आहे रत्नागिरीतील पानांची बाजारपेठ

सांगली, कर्नाटक किंवा आंध्रप्रदेशातून रोज पानांच्या गाड्या येतात. आज हा व्यापारी, उद्या तो व्यापारी अशा गाड्या येतात. आंध्रातून पाने रत्नागिरीपर्यंत येण्यासाठी २४ तास जातात. दररोज जिल्ह्यात किमान १४०० करंड्या पाने येतात. एका करंडीमध्ये दोन ते तीन हजार पाने असतात. बनारस, कलकत्ता आणि मघई पानाच्या करंड्या रोज येत नाहीत. त्या आठवड्यातून एकदाच येतात. आवक होणाऱ्या  साध्या पानांची रोजची किंमत ७० ते ८० हजार रूपयांच्या घरात आहे. त्याखेरीज कलकत्ता, बनारस, मघई या प्रकारातील रोज तीन ते चार हजार रूपयांची पाने रत्नागिरीत येतात. ही झाली केवळ विड्याची पाने. जेव्हा ती तयार करून विकली जातात, तेव्हा त्याची किंमत पाच रूपयांपासून ३० रूपयांपर्यंत आहे. त्यामुळे एकूणच पानांच्या व्यवहारात रोज काही लाखांची उलाढाल होते.

 

कधी होते पानांची तोडणी, बांधणी आणि वाहतूक

विड्याच्या पानासाठी तोडणी, बांधणीची पद्धत आकर्षक असते. मोठ्या आकाराची पाने दर १५ दिवसांनी तोडली जातात तर मध्यम आकाराची पाने दर आठ दिवसांनी तोडली जातात. छोट्या आकाराची पाने ही पानमळ्यातील असतातच,  शिवाय घराच्या बाजूला फुलझाडं असावीत, अशा या वेली लावलेल्या असतात, तेथीलच पाने ही छोट्या आकाराची पाने म्हणून बाजारात येतात. पानाची करंडी बांधण्याची पद्धत आकर्षक आहे. एका करंडीत दोन ते तीन हजार पाने भरली जातात. कर्नाटकात जेव्हा पानांची करंडी बांधली जाते, तेव्हा त्यावर एक फूलही ठेवले जाते.

 

पानांच्या खपालाही सिझन?

पान खायला सिझन असतो का, असा प्रश्न साहजिकच मनात येतो. प्रत्येक व्यवसायाप्र्रमाणे पानाच्या व्यवसायालाही ‘सिझन’ असतो. गणपती, शिमगा, कार्तिकी एकादशी या सणांच्या काळात पानांची विक्री वाढते. देव दिवाळीला माहेरवाशिणींनी देवासमोर विडा ठेवतात. त्यामुळे त्या काळात जवळजवळ पाचशे जादा पान करंड्या मागवल्या जातात. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अजूनही ही प्रथा पाळली जाते.

पानाची वेगवेगळ्या भागातील ओळख

विड्याचे पान ही महाराष्ट्रीय लोकांसाठीची त्याची ओळख. इंग्रजीत विड्याच्या पानाला (betel leave) म्हणतात. संस्कृतमध्ये त्याला ताम्बूल म्हणतात. तेलगूमध्ये पक्कू, तमिळ आणि मल्याळी भाषेमध्ये वेटिलाई, गुजरातीमध्ये नागुरवेल अशी नावे प्रचलित आहेत.

लग्नसराईतील पानांचा वापर घटला

लग्न म्हणजे घरासमोर घातलेला मांडव, आठ-आठ दिवस उठणाऱ्या  पंगती हे ग्रामीण भागातील चित्र. तेथे जेवणानंतर पाहुण्यांसाठी पान सुपारीचे ताट देणे हा अत्यंत प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. आजही ग्रामीण भागात ही प्रथा कायम आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात पानांची मागणी अधिक असते. मोठ्या घरातील विवाह असेल तर एकाच ठिकाणी पानाच्या एक-एक, दोन-दोन करंड्या म्हणजेच चार ते सहा हजार पाने घेतली जात असत. आता मात्र परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात बदलली आहे. लग्न समारंभांचे दिवस अगदीच मर्यादीत झाले आहेत. लग्न घरासमोरच्या मांडवात न होता, मंगल कार्यालयात होत आहेत. त्यामुळे आताच्या लग्नांमध्ये पाचशे ते सहाशे पानेच घेतली जातात. बदलत्या पद्धतींमुळे पानाच्या बाजारपेठेला मोठा धक्का बसला आहे.

सांगली, कर्नाटक, आंध्रातील पाने

रत्नागिरी जिल्ह्यात कोठेही विड्याच्या पानांची लागवड नाही. त्यामुळे जिल्ह्यात सर्वच भागात परजिल्ह्यातून पाने आणली जातात. मे ते आॅक्टोबर या काळात सांगली आणि कर्नाटकातून पाने येतात. सांगली जिल्ह्यातील नरवाड, म्हैशाळ, आरग, रोकुर, बेडं या पाच ठिकाणी पानमळे आहेत. तेथून पाने येतात. त्याचप्रमाणे कर्नाटकातील निपाणी, चिकोडी, रायबाग, शिरगाव, बेळगाव येथून पाने रत्नागिरीत येतात. पानासाठी थंड वातावरणाची आवश्यकता असते. त्यामुळे मे ते आॅक्टोबर याकाळात या भागातून पाने आणली जातात. त्यानंतर नोव्हेंबर ते एप्रिल याकाळात मात्र आंध्रप्रदेशातून पाने आणली जातात. त्यातही आंध्रातील चिन्नूर, कुन्नूर, धरमशाला या भागातून अधिक पाने रत्नागिरी जिल्ह्यात येतात. बनारस आणि कलकत्ता पाने मुंबईहून तर मघई पाने पुण्याहून येतात. करंडीमध्ये बांधलेल्या या पानांची ट्रकनेच वाहतूक केली जाते.

Web Title: Millions of rupees market painted by the leaves of the bride - a symbol of respect even today in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.