भोर घाटात ५० फूट दरीत मिनी बस कोसळली; चालकाचा मृत्यू, नऊ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 01:03 PM2023-10-08T13:03:08+5:302023-10-08T13:03:22+5:30
यामध्ये चिपळूणच्या काही प्रवाशांचा समावेश आहे.
चिपळूण : स्वारगेट- भोर- महाड मार्गे चिपळूणकडे जात असलेली मिनी बस भोर घाटात रविवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास ५० फूट दरीत कोसळली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये चिपळूणच्या काही प्रवाशांचा समावेश आहे.
वरंध घाटात शिरगाव जवळ रविवारी ८ मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास १७ सिटर टेम्पो ट्रॅव्हल्स मिनी बस (MH-08 -AP1530 ) स्वारगेट ते चिपळूण जात होती. यामध्ये १० प्रवासी होते. स्वारगेट- भोर- महाड मार्गे चिपळूणकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हि मिनीबस रस्ता सोडून ५० ते ६० फूट खोल दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली. या अपघातात चालक अजिक्य संजय कोलते (रा. धनकवडी, पुणे) यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळी भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील आपल्या सहकाऱ्यांसह, रेस्क्यु टीमसह घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातामधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघातातील तीन ते चार जखमी प्रवाशांना भोर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. भोरमधील रेस्क्यू टिम, भोर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी व शिरगाव येथील स्थानिकांसह पोलीस मित्र यांनी या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, अशी माहिती भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.