..तर कारवाई करुन तुरुंगात टाकले जाईल, आयुक्त तुकाराम सुपेंच्या कारवाईवर मंत्री सामंतांची स्पष्ट भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 02:44 PM2021-12-17T14:44:17+5:302021-12-17T14:44:54+5:30
जेणेकरुन अशा पद्धतीने कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धाडस कोणताही अधिकारी करणार नाही.
रत्नागिरी : आरोग्य, म्हाडा पेपर फुटीनंतर आता टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा)चे पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पेपरफुटी प्रकरणात अटक केली आहे. या कारवाईवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध मुद्यावर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईबाबतही आपले मत व्यक्त केले.
मंत्री सामंत म्हणाले की, कोणीही कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याने अशाप्रकारचे काम केले असेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. इतकच नाही तर दोषी अधिकाऱ्याला तुरुंगात टाकले जाईल. जेणेकरुन अशा पद्धतीने कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धाडस कोणताही अधिकारी करणार नाही, अशापद्धतीची कारवाई केली जाईल अशी स्पष्ट भूमिका सामंत यांनी मांडली.
आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनीच पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुन कुंपणच शेत खात असल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आज दुपारी अधिक माहिती पत्रकार परिषदेत देणार आहेत.