जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प : ..त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, मंत्री उदय सामंतांनी केले स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:20 PM2021-12-17T13:20:42+5:302021-12-17T13:24:29+5:30
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.
रत्नागिरी : इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने यापूर्वी जनतेच्या भावनांचा विचार करुन प्रकल्पाला विरोध केला आहे. केंद्राने पुन्हा निर्णय घेतला असेल तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जनतेशी बोलतील, त्यांच्या भावना समजून घेतील त्यानंतरच शिवसेना आपली भूमिका मांडेल, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे बोलताना व्यक्त केले.
केंद्र सरकारने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी सहा अणुभट्टया उभारण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. त्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे आपली भूमिका मांडली.
मंत्री सामंत म्हणाले की, शिवसेनेने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला होता. त्यानंतर बरीच वर्ष प्रकल्पाचे काम बंद होते. कालच केंद्र सरकारने पुन्हा प्रकल्पाबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत स्थानिक आमदार असतील, स्थानिक ग्रामस्थ असतील, लोकसभेचे सदस्य विनायक राऊत हे पुन्हा एकदा तेथील लोकांशी जाऊन चर्चा करतील. प्रकल्प कशापद्धतीने होणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही.
शिवसेनेने पूर्वी निर्णय घेतलेला होता तो जनतेला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय होता. जनतेचा विरोध होता. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जनतेशी बोलत नाहीत, त्यांच्या भावना समजून घेत नाहीत, तोपर्यंत बोलणे उचित नाही, असे सामंत यांनी सांगितले.